🌟डेंग्यूला हरविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करा.....!


🌟केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो🌟

परभणी (दि. १० मे २०२३) : राज्यातील जनतेमध्ये डेंग्यूविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अंमलबजावणीमध्ये जनतेने सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यंदा ‘डेंग्यूला हरविण्यासाठी भागीदारी’ ही थीम निवडण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी एकत्र येत डेंग्यू निर्मूलन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

साथरोग अधिनियम १८९७  राज्य शासनाने डेंग्यू हा आजार नोटीफायबल डीसीज घोषित केला आहे. डेंग्यूचा ताप हा २ ते ७ दिवस टिकणारा तीव्र ज्वरीय आजार आहे. यात डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, स्नायूदाह, सांधेदुखी, पुरळ, उपड दिसून येणारा रक्तस्त्राव, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात. नारळपाणी विक्रेते, जुने टायर विक्रेते व पंक्चर दुकानदार यांच्याकडील रिकामे नारळ व जुने टायर यांची विल्हेवाट त्यांनी योग्य प्रकारे करावी. त्यांच्याकडील रिकामे नारळ व टायरमध्ये डासअळ्या आढळून आल्यास साथरोग नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य सहसंचालक श्री. घुणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.  त्यानुसार सर्व खाजगी रुग्णालये व प्रयोगशाळांनाही माहिती देण्यात आली होती असून, दूषित पाण्याच्या ठिकाणी सर्वेक्षण करून तापरुग्णाची रक्त तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रुग्ण वास्तव्याच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेशही आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. 

एडीस इजिप्ती डासाने पाण्यात अंडी घातल्यापासून आठ दिवसात डास तयार होतात. त्यामुळे गाव, प्रभागांमध्ये कोरडा दिवस पाळावा. सर्व भांडी घासून ती दोन तास उन्हांमध्ये वाळवून मगच पाणी भरावे. पाणी भरल्यानंतर भांडी झाकून ठेवावीत. सर्वेक्षणानुसार किटकशास्त्रीय निर्देशांक धोक्याच्या पातळीवर आढळून आल्यास या संपूर्ण कार्यक्षेत्रात कंटेनर सर्वेक्षण करून घ्यावे. अळ्या आढळून आलेले कंटेनर रिकामे करावेत. रिकामे करता न येणाऱ्या कंटेनरमध्ये टेमीफॉस या अळीनाशकाचा वापर करावा. अळ्या असलेले पाणी गटारात न टाकता ते जमिनीवर सोडून द्यावे. गाव परिसरातील टायर, फुटके डब्बे, रिकामे नारळ असे निरुपयोगी वस्तुची विल्हेवाट लावावी. तुंबलेली गटारे तसेच साचलेले पाणी वाहते करावे. खड्डे बुजावेत व इतर ठिकाणी आढळून येणाऱ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी माश्यांचा वापर करावा. उद्रेकाचे स्वरूप व व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आढळून आल्यास धूर फवारणी करावी. 

घर व परिसर स्वच्छ ठेवावा. आठवड्यापेक्षा जास्त काळ पाणी साठवून ठेवू नये. आठवड्यातून किमान दोन वेळेस पाणीसाठे रिकामे करून कोरडे झाल्यानंतरच पाणी भरावे. भंगार सामान घराबाहेर, छतावर ठेवू नये. त्यामध्ये पावसाचे पाणी साठून राहिल्यास डासांची उत्पत्ती होते. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक संरक्षणासाठी डासांना पळवून लावणाऱ्या साधनांचा वापर करावा. नाली, गटारे वाहती ठेवावीत जास्त काळ पाणी साठून राहत असल्यास त्यामध्ये जळालेले तेल, वंगण, केरोसीन टाकावे. पाण्याची डबकी, तळे या ठिकाणी गप्पीमासे सोडावेत. तापाचा रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार करावा. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास किटकजन्य रोग हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याचा प्रसार रोखण्यास निश्चितच मदत होईल, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही. आर. पाटील यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या