🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा लाभ घ्यावा....!


🌟उपपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांचे आवाहन🌟

परभणी (दि.१० मे २०२३) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी मोहिमेला १५ एप्रिल पासून राबविण्यास सुरुवात झाली असून, मोहिमेच्या माध्यमातून १५ जून २०२३ पर्यंत विविध शासकीय योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात एकाच छताखाली किमान ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय विविध योजनांचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या आदेशानुसार परभणी तालुक्यासाठी अंदाजे १० हजार सेवा जनतेला देण्याचा मानस उपविभागांतर्गत करण्यात येणार असल्याचे श्री. शेवाळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी प्रथम प्राधान्य राबणार असून, शिधापत्रिकांशी संबंधित सर्व योजनांचा त्यात समावेश आहे. तहसील कार्यालयातील अभिलेख विभागातून जनतेस आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या नक्कल प्रती उपलब्ध करुन देणे, निवडणूक विभागामार्फत ओळखपत्र अंदाजे चार हजार लोकांना वाटप करणे, निवडणूक मतदार यादीत नवीन नाव अंतर्भूत करणे, मयत असल्यास वगळणी करणे नाव, वय, पत्ता, फोटो याबाबत दुरुस्ती करुन माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे. सातबाराचे वितरण तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयातून फेरफार आणि ८ अ चा उतारा व इतर प्रमाणपत्रे, विविध प्रकारचे शैक्षणिक व इतर योजनांचे प्रमाणपत्र, उत्पन्न, वय, अधिवास, रहिवाशी, जात प्रमाणपत्राचे वाटप करणे, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, आधार अद्ययावतीकरण संदर्भातील सेवा देण्याचा जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आणि तहसीलदार गणेश चव्हाण यांनी नियोजन केले आहे. 

उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय महा-ई-सेवा केंद्रांकडे रितसर अर्ज करुन जास्तीत-जास्त योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. ‘शासन आपल्या दारी’ ही महत्वाकांक्षी मोहीम तालुका प्रशासन तसेच सर्व नागरिकांनी यशस्वी करावी, असे आवाहन उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या