🌟परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातीलजांब तांड्यात विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू...!


🌟संतप्त नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार🌟

जिंतूर  प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर

विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह उतरल्याने खांबाला स्पर्श होऊन एका ३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील जांब तांडा येथे आज मंगळवारी सकाळी 08-00 च्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील जांब तांडा येथे एका विद्युत खांबाला अचानक विद्युत प्रवाह उतरला.या विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाजवळ खेळत खेळत गेलेल्या ३ वर्षीय बालकाचा अचानक खांबाला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोराचा धक्का बसला.यामध्ये तो गंभीर जखमी झाला.नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी तात्काळ जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.अनिकेत अमोल राठोड असे मृत बालकाचे नाव आहे.

दरम्यान महावितरणच्या गलथान कारभारामुळे सदर बालकाला आपला जीव गमवावा लागला. घटनेचा पंचनामा करून महावितरण अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.तसेच मृत बालकाच्या कुटूंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी करत जोपर्यंत महावितरण कडून लेखी आश्वासन देण्यात येत नाही  तोपर्यंत  मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मृत बालकाच्या नातेवाईकांनी घेतला.त्यानंतर महावितरणचे सहाय्यक अभियंता कामठी ,आडबे यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन लेखी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

याप्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या