🌟खरीप हंगाम सन २०२२ राज्यस्तरीय पीकस्पर्धेचा निकाल जाहीर....!


🌟यावर्षीही शेतकऱ्यांनी ११ पिकांच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले🌟 

 परभणी (दि.०८ मे २०२३) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलामध्ये वाढ होऊन कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे इतरांना मार्गदर्शन होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, यासाठी राज्यांतर्गत पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा  नुकताच निकाल लागला असून, यावर्षीही शेतकऱ्यांनी ११ पिकांच्या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. 

 राज्यात खरीप हंगाम सन २०२२ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भूईमूग व सूर्यफुल या ११ पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीसे देण्यात येतात. खरीप हंगाम सन २०२२ पीकस्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने निकाल जाहीर केला.  

राज्यस्तरीय खरीप पिकस्पर्धेत भात सर्वसाधारण गटामध्ये शेतकरी नितीन चंद्रकांत गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळविला. मराठवाड्यातील महिला शेतकरी श्रीमती जयश्री भीमराव डोणगापूरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शेतकरी बाजीराव सखाराम खामकर यांनी सोयाबीन सर्वसाधारण गटात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहापट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. नांदेडच्या श्रीमती वनिता श्रीराम फोले यांनी सोयाबीन आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम तर यवतमाळच्या श्रीमती रेखा रमेश कुमरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. शेतकरी प्रल्हातद नारायण काळभोर यांनी ज्वारी पिकात तर संभाजी तातोबा खंडागळे यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सात पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस अनुक्रमे ५०, ४० आणि ३० हजार रुपये रोख असून, शेतकऱ्याने एका हेक्टरमध्ये घेतलेले उत्पादन क्विंटलमध्ये घेतले जाते. पीक स्पर्धेसाठी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये प्रवेश शुल्क भरून पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या