🌟ठाण्यात ‘आम्ही सिध्द लेखिका’ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त दि.22 एप्रिल रोजी महिला साहित्य संमेलन...!


🌟संमेलनाध्यक्ष म्हणून नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांची उपस्थिती राहणार🌟

परभणी (दि.19 एप्रिल) : ‘आम्ही सिध्द लेखिका’ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा शाखेतर्फे दि.22 एप्रिल रोजी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

             ठाण्यातील मो.ह.विद्यालयाच्या तृप्ती बँक्वेट हॉलमध्ये एकदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधी 400 लेखिका उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रंथ दिंडी, उद्घाटन सोहळा, मुलाखती, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी  साहित्य रसिकांना देण्यात येणार आहे. यावेळी अनेक दिग्गज लेखिका मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.

             या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सुपरिचित लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांची उपस्थिती राहणार आहे. ठाण्याच्या साहित्य आणि समाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या अ‍ॅड. माधवी नाईक या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत. स्वागताध्यक्षांची जबाबदारी संस्थेच्या विश्‍वस्त उषा चांदुरकर यांनी स्वीकारली आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रा. पद्मा हुशिंग यांनी दिली.

              याच दिवशी सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि निवेदिका मंगला खाडीलकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त आणि निमंत्रित कवयित्रींचे बहारदार कविसंमेलन ‘ती’ च्या कविता या विषयावर संपन्न होणार आहे. संस्थेकडून यावर्षी साहित्य ‘तपस्विनी’ हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष शुभांगी भडभडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘ती बोलू लागली’ या परिसंवादात विविध क्षेत्रातील मान्यवर  लेखिका सहभागी होणार आहेत. संस्थेतील नवोदित लेखिकांचे   पुस्तक  प्रकाशन  मान्यवरांच्या साक्षीने  होणार आहे. संस्था स्थापनेनंतर केवळ दोन वर्षात राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

           दरम्यान, या संमेलनासाठी ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या परभणी जिल्हा सदस्या अर्चना संबरकर, शुभांगी राऊतमारे, मयुरा देशमुख, शिल्पा पोटेकर, सारिका सेलूकर, सविता वडगावकर, सुप्रिया श्रीमाळी, सविता काळवीट, अर्चना पौळ, प्राजक्ता कंधारकर, रेखा येळंबकर, सुवर्णा मुळजकर, अश्‍विनी कुलकर्णी आणि अर्चना डावरे या साहित्यिका उपस्थित राहणार असून सहभागी होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या