🌟परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जमीन हस्तांतरीत....!


🌟ब्राह्मणगाव व ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव येथील २० हेक्टर जमीन रेडीरेकनर दरानुसार जमिनीचे २ कोटी ३४ लक्ष ९१ हजार रुपये मूल्य🌟

परभणी (दि.२७ एप्रिल) : येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरु होण्याच्या दृष्टिने आज महत्त्वपूर्ण पाऊल पडले असून, महाविद्यालय स्थापनेसाठी ब्राह्मणगाव येथील गट क्रमांक ३०९ व १५५ मधील (१६.१७) व ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव येथील गट क्रमांक २ मधील (३.८३) अशी एकूण २० हेक्टर जमीन रेडीरेकनर मूल्यानुसार हस्तांतरणाची प्रक्रिया शासन निर्णयाद्वारे झाली आहे. 

परभणी जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यसुविधा सहज आणि नजिक उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय महत्त्वाचे असून, येथील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या नवीन महाविद्यालयास संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रियेने आता वेग घेतला आहे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांची दुय्यम कंपनी परभणी कृषी गो-संवर्धन मर्यादित यांची २० हेक्टर जमीन परभणी येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यास उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाकडून जिल्हाधिकारी, परभणी यांच्यामार्फत मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांना सादर करण्यात आला होता. पुढे तो प्रस्ताव उद्योग विभागाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला. त्यामुळे २ मार्च, २०२२ रोजी मंत्रिमंडळाने शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय उभारणीच्या आवश्यक बाबींसाठी वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या प्रस्तावास मान्यता दिली.

या जमिनीचे रेडीरेकनर मूल्य वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने महिन्याभरापूर्वी राज्य शासनाने प्रोत्साहन योजनेसाठी दिलेल्या कर्जाची मराठवाडा विकास महामंडळाकडून परतफेड लेखाशिर्षाखाली ही रक्कम जमा केली. वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाने १७ एप्रिल २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे उद्योग विभागाने संबंधित जागेचा प्रत्यक्ष ताबा महसूल विभागामार्फत वैद्यकिय शिक्षण विभागास देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. 

            उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांची दुय्यम कंपनी परभणी कृषी गो संवर्धन मर्यादित यांच्या २० हेक्टर सलग जमीनीचा ताबा संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांनी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. या विवरणपत्रातील परभणी कृषी गो संवर्धन मर्यादित यांच्या उर्वरित जमिनीचा ताबा कृषी गो-संवर्धन  यांच्याकडे ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा तिच्यातील कोणतेही हितसंबंध विक्री, देणगी देऊन, अदला बदल करुन, गहाण ठेऊन, पट्टयाने देऊन, खाजगी सार्वजनिक सहभाग तत्वावर किंवा बाह्य यंत्रणाद्वारे किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही, या महत्त्वपूर्ण अटीवर हस्तांतरीत करण्यात आली आहे.

 या जमिनीवर अथवा त्याच्या कोणत्याही भागावर अन्य व्यक्ती, संस्था, कंपनी इत्यादींचे कोणत्याही प्रकारचे हक्क निर्माण होतील, अशा प्रकारे हस्तांतरीत करता येणार नाही. तसेच शासनाच्या उद्योग विभागाच्या पूर्वमान्यतेशिवाय जमिनीचे पोटविभाजन करता येणार नाही. संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करता येणार आहे. अन्य कोणत्याही कारणासाठी ही जागा वापरायची असल्यास उद्योग विभागाची पूर्वमान्यता घेणे आवश्यक राहणार आहे.  या जमिनीवर संबंधित नियोजन प्राधिकरणाच्या विहित परवानगीने व मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकास होणे बंधनकारक राहील. तसेच या व्यतिरिक्त अन्य संबंधित विभाग, शासकीय यंत्रणेची मान्यता, पूर्वपरवानगी किंवा ना हरकत घेणे देखील बंधनकारक राहणार आहे. या जागेवरील नियोजित प्रयोजनामुळे लगतच्या खातेदारांना कोणताही त्रास होणार नाही, त्यांच्या वैध वहीवाटीस बाधा येणार नाही, याची दक्षता घेण्याचेही नमूद करण्यात आले आहे.

   वैद्यकिय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या १७ एप्रिल २०२३च्या शासन निर्णयातील जमीन मंजुरीसंदर्भातील अटी व शर्ती लागू राहणार आहेत. जमिनीबाबत फेरफार, ७/१२, ८ ( अ ) तसेच अन्य ठिकाणी सुधारित नोंदी महसूली अभिलेखात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच याचा पुस्तकी समायोजनाने उपलब्ध निधीचा ताळमेळ संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, मुंबई व व्यवस्थापकीय संचालक, मराठवाडा विकास महामंडळ, औरंगाबाद यांनी घेण्याचे आदेशही राज्यपालांचे सहसचिव संजय देगावकर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या शासन निर्णयात देण्यात आले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या