🌟परभणी जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गाची कामे अर्धवट कशी काय राहतात याचे कोडेच आपणास अद्याप उलगडले नाही...!


🌟केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरींनी केला प्रश्न उपस्थित : कंत्राटदारांना ब्लॅकमेल करणे थांबवा असेही गडकरी म्हणाले🌟

🌟राज्य व राष्ट्रीय महामार्गाची कामे क्वालिटीची करुन घ्या : नुसत्या तक्रारींचा पाढा नको - नितीन गडकरी 

परभणी (दि.25 फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गाची कामे अर्धवट कशी काय राहतात, याचे कोडेच आपणास अद्याप उलगडले नाही, अशी खंत जाहीरपणे व्यक्त करतेवेळी  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या ओघात संबंधित कंत्राटदारांना, एजन्सीधारकांच्या पदोपदी तक्रारी करीत ब्लॅकमेल करण्याचे उद्योग तातडीने थांबवा, असा टोला हाणला.

            वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या प्रांगणात शनिवारी परभणी बाह्यवळण रस्त्याच्या भूमीपूजनासह अन्य कामांच्या कोनशिला समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गडकरी यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट व परखडपणे भूमिका मांडल्या. विशेषतः कंत्राटदार व एजन्सीधारक हे बिलो ने टेंडर घेवून कामे करीत आहेत. हे खरे, परंतु खूल्या स्पर्धेत, ई-टेंडरच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही, हे नमूद करीत संबंधित कंत्राटदार, एजन्सीधारकांच्या सातत्याने तक्रारी करीत ब्लॅकमेल करण्याऐवजी त्या एजन्सीधारक व कंत्राटदाराकडून क्वालिटीची कामे करुन घ्या, ती मंडळी क्वालिटीची कामे करीत नसतील, तर तात्काळ कळवा, असे स्पष्ट करीत गडकरी यांनी आपण आज पर्यंत 50 लाख कोटी रुपयांची रस्ते कामे केली आहे. परंतु, आजपर्यंत एक कंत्राटदार एजन्सीधारकसुध्दा आपल्या घराची पायरी चढला नाही, असे स्पष्ट करतेवेळी एजन्सीधारकास ब्लॅकमेल करु नका, असे ते म्हणाले.

            यावेळी सभागृहातील नागरीकांनी गडकरी यांच्या या आवाहनाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले तेव्हा गडकरी यांनी परभणी जिल्ह्यातील स्थिती काय, हे आपणास माहिती नाही, आपण जे काही बोलतोय ते देशभरापुरते आहे. चुकून परभणी जिल्ह्याशी ते लागू होत असेल तर, आपला नाईलाज आहे, अशी कोपरखळीही हाणली. परभणी जिल्ह्यातील पुढारी हे सक्षम आहेत, हुशार आहेत. आपण सर्वांनी एकत्रितपणे या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा, जिल्ह्यातील मागासलेपणा कसा घालवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

           परभणी बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनाकरीता 3 वर्ष  लागली, अशी खंत व्यक्त करतेवेळी, असे प्रकार विकासाकरीता अडथळे ठरणारे आहेत, असे ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या