💥पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता ३ वर्षीय बालक प्रकरणाचा तपास लावण्यात स्थागुशाला यश...!


💥जुन्या भांडणावरुन शेजाऱ्यांनीच अपहरण करुन बालकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस💥

माखणी/ प्रतिनिधी

पूर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता तीन वर्षीय बालकाच्या अपरहणाच्या गुन्ह्याचा तपास लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. जुन्या भांडणावरुन शेजाऱ्यांनीच अपहरण करुन  तीन वर्षीय बालकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्याचे प्रेत घरातील फरशीखालून काढून  पोलीसांनी आज तारीख १७ जानेवारी रोजी पंचनामा केला आहे.

   ताडकळस पोलीस ठाण्या अंतर्गतातील या प्रकरणात दि.१३ जानेवारी रोजी  गणेश भिमराव धोत्रे (रा. सिध्देश्वर कळगाव परिसर ता. पूर्णा) यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली होती की,  त्याची पत्नी शेतातून परत येत असताना त्यांचा मुलगा गोविंद गणेश धोत्रे (वय ३ वर्षे) याचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले. त्यावरुन कलम ३६३ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येवून गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलीस करीत होते. या गुन्ह्याची संवेदनशिलता ओळखून पोलीस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी चार पथके नेमण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधिक्षक यशंवत काळे,  स्था. गु. शा.चे प्रभारी अधिकारी वंसत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि व्यंकट कुसमे, पोउपनि साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, राहुल परसोडे, सय्यद मोबीन, जयश्री आव्हाड, दिलावर खान पठाण, सिध्देश्वर चाटे, राम पौळ, रफीक, अनिल कोनगुलवार, नामदेव डुबे, पिराजी निळे (सर्व नेमणुक स्था.गु. शा. परभणी) यांचे पथक नेमण्यात येऊन  सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार गणेश कऊटकर, बालाजी रेड्डी यांच्या मदतीने ताडकळस  पोलीस ठाण्यातील कलम ३६३ भादंवी मधील अपहृत बालक व आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता. या गुन्हयातील अपहृत बालक व अज्ञात आरोपीचा शोध ताडकळस हद्दीत घेत असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील अपहृत बालकास त्यांच्या शेजारी राहणारी कावेरी गजानन बनगर हिने त्यास उचलून नेवून जिवे ठार मारुन पुरले आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने संशयित महिलेस ताडकळस पोलीस ठाणे येथे बोलावून या गुन्ह्यातील अपहृत बालकाबाबत विश्वासात घेवून विचारपुस केली. आमच्या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन बदला घेण्याच्या उद्देशाने आमच्या अंगणात हा बालक खेळत असताना त्यास उचलुन घेवून आमच्या घरात नेले व सासूने आणि मी त्यास जिवे ठार मारुन स्वतःच्या  घरामध्ये कोप-यात पुरले आहे, असे तिने सांगितले. त्यावरुन या गुन्ह्यातील महिला आरोपी कावेरी गजानन बनगर व तिची सासू अन्नपुर्णा बालासाहेब बनगर (दोन्ही रा. सिध्देश्वर नगर, कळगाव ता पूर्णा जि परभणी यांनी या गुन्ह्यातील अपहृत बालकाचे अपहरण करुन खून केल्याचे सांगत असल्याने  तहसीलदार यांच्या उपस्थितीत बालकाचे प्रेत घरातील फरशी खालून बाहेर काढण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. आरोपी दोन्ही महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन ताडकळस पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे. गुन्ह्याचा तपास स पोलीस निरीक्षक विजय रामोड हे करीत आहेत.दरम्यान या ह्रदयद्रावक घटनेमुळे ताडकळस परीसरात एकच खळबळ उडाली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या