💥वाशिम जिल्हा श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी : श्वान पथकाच्या मदतीने गुन्हे तपासास गती...!


💥जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर उपलब्ध असलेले गुन्हेशोधक श्वान ‘लुसी’ हिचे प्रशिक्षण २०१७ मध्ये पूर्ण झाले💥

(फुलचंद भगत)

वाशिम (दि.२० जानेवारी) :- जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस श्वान पथकाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली. श्वान पथक, वाशिम येथे ०१ अधिकारी व ०७ अंमलदार नेमणुकीस असून एकूण ०३ श्वान आहेत. त्यापैकी ०२ श्वान हे गुन्हेशोधक असून ०१ श्वान अंमली पदार्थ शोधक आहे. प्रत्येक श्वानावर प्रत्येकी ०२ श्वान हस्तक नेमणुकीस आहेत. हे श्वान हस्तक सदर श्वानाचे संगोपन व दररोज सकाळ संध्याकाळ गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने श्वानांचा सराव करून घेतात.

     वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर उपलब्ध असलेले गुन्हेशोधक श्वान  ‘लुसि’ हिचे प्रशिक्षण २०१७ मध्ये पूर्ण झाले तर ‘बेला’ या श्वानाचे प्रशिक्षण २०२२ मध्ये पूर्ण झाले असून दोन्ही गुन्हेशोधक श्वान पोलीस दलात आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. श्वान पथक आस्थापनेवरील श्वान ‘रॉय’ हा अंमली पदार्थ शोधक श्वान असून २०२२ मध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण करून वाशिम पोलीस दलात सेवा देण्यासाठी दाखल झाला आहे. वाशिम पोलीस दलातील गुन्हे शोधक श्वान ‘लुसि’ व ‘बेला’ यांच्यामुळे पोलीस तपास कामात चांगली गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे खून, दरोडा, जबरी चोरी, विटंबना अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासात या श्वानांचा मोलाचा उपयोग झाला आहे.

     श्वान ‘लुसि’ हि अतिशय चपळ असून सन २०२२ मध्ये तिने एकूण ६६ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची भुमिका बजावली आहे. पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील मौजे केकतउमरा येथील अप.क्र.१९४/२२ कलम ३०२ भादंवि. मध्ये दि.०७.०५.२०२२ रोजी  केकतउमरा येथील दुर्गामाता मंदिराचे पुजारी मारोती भिकाजी पुंड यांच्या खुनाच्या प्रकरणात घटनास्थळावरील मोबाईल व स्टीलचा ग्लास या वस्तूंचा वास दिला असता त्याचा मागोवा घेत लोकांमध्ये उभ्या असलेल्या आरोपीस ओळखून सदर गुन्हा उघड होण्यास मोलाची मदत केली. यापूर्वीसुद्धा वाशिम जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनअंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी बजावली आहे.

     मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.सतीश लाड, पुंडलिक राखोंडे, सपोउपनी. शेषराव शेजुळकर, पोकॉ.सुभाष इंगोले, तुषार गाडेकर, व्यंकटेश रावलेवाड, गणेश ढोरे व महेंद्र जाधव हे श्वान पथक वाशिम येथे कामगिरी बजावत आहेत.....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या