💥कर्मच श्रेष्ठ...चांगले कर्म करा : फळ निश्‍चित मिळेल - पुज्य पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा महाराज


💥शिवपुराण कथा सोहळ्यात परम पुज्य पंडीत श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांनी केले प्रतिपादन💥

परभणी (दि.१७ जानेवारी) : कर्म हे श्रेष्ठच आहे, म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यभरात दैनंदिन व्यवहारासह व्यापात चांगलं काम, कर्म केले पाहिजे, त्याचे निश्‍चितच चांगले फळ मिळेल, असा विश्‍वास सुप्रसिध्द शिवपुराण कथाकार प.पू. पंडीत प्रदीपजी महाराज मिश्रा यांनी आज मंगळवार दि.१७ जानेवारी रोजी व्यक्त केला.

          पाथरी महामार्गावरील लक्ष्मी नगरीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या पाच दिवशीय शिवपुराण कथेच्या समारोपीय म्हणजे पाचव्या दिवशी कथेचा समारोप करतेवेळी ते बोलत होते.

          देव-देव, भक्तीमार्गावर आक्षेप, टीका टिप्पणी व नाक मुरडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. फॅशनेबल या युगात या बाबी अर्थहीन ठरविल्या जात आहेत, अशी खंत व्यक्त करतेवेळी प.पू. पंडीत प्रदीपजी मिश्रा यांनी इतिहास तपासा, संत ज्ञानेश्‍वरांपासून संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत मिराबाई वगैरे संत महंतांनासंध्दा भक्तीमार्गात पदोपदी या उपद्रवींचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला आहे. परंतु, हे संत महंत भक्तीमार्गात कधीच विचलित झाले नाहीत, उलट ते भक्तीमार्गात तल्लीन होत गेले. त्यामुळेच या संत - महंतांना साक्षात पांडुरंग भेटला, असे नमूद करीत प.पू. मिश्राजी यांनी फॅशनच्या या युगात  भक्तीमार्गातील प्रत्येकाने या सार्‍या आक्षेप व टिका टिप्पणींकडे पध्दतशीरपणे दुर्लक्ष केले पाहिजे. भक्तीमार्गातच तल्लीन राहीले पाहिजे. कारण, भक्तीमार्गच, शिवभक्तीच अखेर सर्वश्रेष्ठ आहे, असे ते म्हणाले.

        कर्मच श्रेष्ठ आहे, याचे सुंदर असे विवेचन करतेवेळी प.पू. मिश्राजी महाराज यांनी तब्बल 12 वर्ष दुष्काळी स्थितीतसुध्दा दरवर्षी इनामेइतबारे शेत नांगरणार्‍या शेतकर्‍याचे उदाहरण दिले. पाऊस नाही, तरीसुध्दा तू का नांगरतोय, असा सवाल केल्यानंतर त्या शेतकर्‍याने  ‘कोणी कितीही हसो, नांगरणं सोडणार नाही, हे काम सोडले तर कामाची सवय सुटेल. पाऊस पडो न पडो आपण आपलं कर्तव्य, कर्म केलेच पाहिजे,’ असे म्हटले. याचाच अर्थ शेतकरी आशावादी आहे. त्याने कामाचे महत्व त्यातून विशद केले आहे. या शेतकर्‍याच्या त्या कर्मानेच भगवंताने शंखाद्वारे वर्षावृष्टी केली. म्हणजेच कर्म श्रेष्ठ ठरले, असेही नमूद केले.

        बँकेच्या लॉकरला दोन किल्ल्या असतात. त्यापैकी एक किल्ली ग्राहक तर दुसरी बँक व्यवस्थापकाकडे असते. या दोन्ही किल्ल्या वापरल्याशिवाय लॉकर उघडत नाही. त्याप्रमाणे शिवभक्तीतही तेच सूत्र आहे.  एक किल्ली भक्ताकडे तर दुसरी किल्ली भगवंताकडे आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येकाने कर्म केले पाहिजे. भगवंत कधी ना कधी तुमचे कल्याणच करेल, असा विश्‍वासही प.पू. मिश्राजी यांनी यावेळी व्यक्त केला.

        आपल्या आयुष्यभरात प्रत्येकाने छोट्या-मोठ्या गोष्टीतून कर्म केलीच पाहिजेत, असे आवाहन करतेवेळी प.पू. मिश्राजी महाराज यांनी लग्न कार्यामधील उधळपट्टी, भेटवस्तूंचा सुळसुळाट या विषयी तीव्र खंत व्यक्त केली. जो पैसा आपण दिखाव्याकरीता उधळतो, त्याऐवजी तो पैसा रुग्णांवर, विद्यार्थ्यांवर, गरजवंतांवर खर्च केला पाहिजे. त्याद्वारे मदतीचा हात दिला पाहिजे, असे ते म्हणाले.

       प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा सारासार विचार करतेवेळी आपण काय कमावलं, काय गमावलं याचे आत्मपरीक्षण करतांना आपण आयुष्यात काय कर्म केलं याचेही निरपेक्षपणे मूल्यमापन केले पाहिजे. दाग-दागिणे, पैसा-अडका, गाडी-बंगले, भौतिक सुख वगैरे गोष्टींपेक्षाही आपण आयुष्यात काय कर्म केलं, काय परमार्थ केला, हेच महत्वपूर्ण आहे. तेच सुखी जीवनाचे सूत्र आहे, असे प.पू. मिश्राजी महाराज यांनी नमूद केले.

       भजन-कीर्तन, जप-तप हाच भक्तीचा मार्ग आहे. त्यातूनच प्रत्येकाने शिवभक्ती साधली पाहिजे. तरच त्याचे फळ निश्‍चित आहे, असे विशद करतेवेळी शिवभक्तीवरच विश्‍वास ठेवा, पूर्णतः विसंबून रहा, शिवभक्तीच भक्तास, वेळस तारणहार ठरणारी आहे, असा विश्‍वासही व्यक्त केला. तंत्र-मंत्र, जादूटोणा वगैरे गोष्टी या शुध्द अंधश्रध्दा आहेत. कोणाचेही ऐकून या गोष्टींकडे वळू नका, असे आवाहनही केले. वेळ चांगला असेल तरच सर्वकाही ठिक आहे. त्यामुळेच वेळेचे महत्व ओळखा, वेळ सत्कर्मी लावा, असेही आवाहन केले.

* हसतमुखाने जगा :-

         पशू-पक्षी, जनावरे वगैरेंना भगवंताने हास्य दिलेले नाही. मानवासच फक्त हास्य प्राप्त आहे. माँ पार्वतीलाही हाच प्रश्‍न पडला, तेव्हा असे का? असे तीने शिवशंकरास विचारले तेव्हा, हास्यसुध्दा ही एक भक्तीच आहे, प्रार्थना आहे, असे उत्तर आले. त्यामुळे माणसाने हसतमुख जगले पाहिजे. जो हसतमुख जगत नाही, तो शरीरातून मृतच असतो. अणि जो मनुष्य हसतमुख जगतो तोच समृध्दपणे आयुष्य जगू शकतो, असे प.पू. मिश्राजी महाराज यांनी म्हटले. परभणीकरांचे कौतूक करतेवेळी सर्वांच्या मनोकामना निश्‍चितपणे पूर्ण होतील, असा आशिर्वाद दिला.

* खासदार संजय जाधव यांनी खेळली फुगडी :-

        या कथेच्या समारोपीय सोहळ्यात खासदार जाधव यांनी प्रास्ताविकातून या कथा सोहळ्यास अल्प काळात सर्वार्थाने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या व्यक्ती व संस्थांचे खूल्या दिलाने आभार व्यक्त केले. भव्यदिव्य कथा सोहळ्यास सार्‍यांचे संयुक्त प्रयत्नच कारणीभूत आहेत, असेही ते म्हणाले. प.पू. मिश्राजी यांनी या समारोपीय सत्रातसुध्दा सुंदर भजने सादर केली. त्यावेळी जाधव हे हभप अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या बरोबर फुगडी खेळले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या