💥परभणी जिल्हा प्रशासन दुर्धर आजारग्रस्तांच्या संवेदनशीलतेने पाठीशी - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥‘सन्मान संवेदनशीलतेचा’ कार्यक्रमाचे आयोजन💥


परभणी (दि.01 नोव्हेंबर) : दैनंदिन जीवन जगताना दुर्धर आजारग्रस्तांशी कोणताही भेदभाव न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असून, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत जिल्हा प्रशासन पूर्ण संवेदनशीलतेने पाठीशी असल्याचा विश्वास देण्याचे काम करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने नियोजन भवन समितीच्या सभागृहात जागतिक एड्स दिनानिमित्त ‘सन्मान संवेदनशीलतेचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्रीमती गोयल बोलत होत्या. 


जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, विहान काळजी व आधार केंद्राच्या अध्यक्षा बबीता चारण प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या. 


समाजातील अनेकांना दुर्धर आजारांचा सामना करावा लागतो. अशा नागरिकांशी समाजाने संवेदनशीलतेने वागून विश्वास देण्याचे काम केले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. राज्य शासनाच्या विविध योजना गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागांनी स्वत:हून पुढाकार घेतल्यास दिव्यांग, विधवा, परितक्त्या, दुर्धर आजारग्रस्त असा समाजाचा मोठा भाग मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल. त्यामुळे अशा नागरिकांशी भेदभाद टाळून त्यांना समाजात सन्मानाने वागविण्याची जबाबदारी एक समाज म्हणून आपल्या सर्वांची असल्याचे सांगून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हा प्रशासनातील एका संवेदनशील अधिकाऱ्याच्या पुढाकारातून संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मोठे काम उभे करता आले असल्याचा अभिमान असल्याचे श्रीमती गोयल यांनी सांगितले. 


समाजातील या वंचित घटकाला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वजण पुढाकार घेऊया असे सांगून त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांप्रती ऋण व्यक्त केले. तसेच विहान काळजी व आधार केंद्रांच्या अध्यक्षा बबीता चारण यांनी संकटात संधी शोधली असून त्यांच्या या कार्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी व्यक्त केला. 

वंचित आणि गरजू घटकापर्यंत जिल्हा प्रशासन पोहचल्याचे कदाचित हे एकमेव उदाहरण असेल, असे सांगून विहानच्या अध्यक्षा श्रीमती चारण यांनी संकटात असताना प्रचंड निराशा आली होती. आत्मविश्वास डळमळीत झाला होता. मात्र राज्य शासनातील विविध विभागातील अनेक संवदेनशील अधिकाऱ्यांनी मदत केली. विहान केंद्राच्या माध्यमातून अनेकांना मदत करता येत असल्याचे सांगत कठीण काळात नव्या जोमाने उभे राहिल्यास नव्याने काम करु शकतो, असे श्रीमती चारण यांनी आपल्या मनोगतात सांगितले. 

जिल्हा प्रशासनात संवेदनशील नेतृत्व लाभल्यास प्रशासनात राहूनही वंचित आणि गरजू लाभार्थ्यांसाठी मोठे कार्य उभे करता येऊ शकते, असे सांगून उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रास्ताविकात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात हे मोठे काम झाले असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तहसील कार्यालये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी यांच्यासह शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून विधवा, परितक्त्या, दिव्यांग आणि दुर्धर आजारग्रस्तांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून मदत करता येत असल्याचे सांगत बालसंगोपन योजनेतूनही अनेकांना लाभ मिळवून दिल्याचे श्री. वडदकर यांनी सांगितले.  


यावेळी दुर्धर आजारग्रस्तांपैकी काही जणांनी प्रातिनिधीक स्वरुपात भावना व्यक्त करताना आमचा कोणताही दोष नसताना समाज झिडकारतो, स्वीकारत नाही, याचे वाईट वाटते. तसेच दैनंदिन जीवन जगताना सतत टोमणे ऐकावे लागतात. एक प्रकारे बहिष्कृतच केल्याची भावना वाढीस लागते असे सांगून आम्हालाही जगून आणि करून दाखवायचे आहे, असे सांगताना संपूर्ण सभागृह भावनाविवश झाले होते.

संजय गांधी निराधार योजनेतील 1683 लाभार्थ्यांना एक हजार रुपये आणि बालकल्याण योजनेच्या 317 लाभार्थ्यांना अकराशे रुपये प्रति महिना लाभ मिळणार आहे. या दोन्ही योजनांचे लाभ मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या 25 स्वयंसेवी संस्थांच्या 150 पदाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रशासनातील उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, सुधीर पाटील, शैलेश लाहोटी, अरुणा संगेवार, तहसीलदार गोविंद येरमे, सखाराम मांडवगडे, प्रतिभा गोरे, सुमन मोरे, दिनेश झांपले आणि पल्लवी टेमकर, प्रतीक्षा भुते, सारंग चव्हाण, गणेश चव्हाण, नायब तहसीलदार कैलास वाघमारे, सुनील कांबळे, परेश चौधरी, संदीप साखरे, वसुधा बागुल, प्रशांत थारकर आणि दशरथ कोकाटे, नकुल वाघुंडे, अनिल घनसावंत, शेख मोहम्मद वसीम यांच्यासह महाआयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निरज धामणगावे, वरिष्ठ सहायक अभियंता नरेंद्र आडगावकर, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहायक आणि आयटी सहायक यांचा समावेश होता. 

जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे संनियंत्रण अधिकारी डॉ. संजय मस्के, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलगे, एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राचे हंसराज गायकवाड, ए.आर.टी केंद्राच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजूषा कुलकर्णी व समुपदेशक, विहान काळजी व आधार केंद्राच्या अध्यक्षा बबीता चारण आणि त्यांचे सर्व सहकारी, सेतू चॅरिटेबल ट्रस्टचे शेख मुस्तफा शेख पाशामियॉ आणि त्यांचे सहकारी, एमएसएमआयटी स्वप्नभूमी सामाजिक संस्था केरवाडीच्या रेणुका आदमाने आणि त्यांचे सहकारी, अखिल सर कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थिनी, आणि हरिओम कॅटरर्सचे संपत पुरी यांचा जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, परीविक्षा अधिकारी अर्चना मनतकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष रवींद्र कातनेश्वरकर आणि समिती सदस्य तसेच दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, विभाग प्रमुख मंगेश फुलारी, शाखाधिकारी डिगांबर सोळंके आणि बँक अधिकारी यांचाही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  

परभणी शहरातील महा-ई- सेवा केंद्रांचे बाकले, श्री. गजानन, उदय आणि डागा महा-ई-सेवा केंद्र परभणी, मयुरी महा-ई-सेवा केंद्र, मानवत, ढगे महा-ई-सेवा केंद्र, गंगाखेड, परम महा-ई-सेवा केंद्र जिंतूर, यश महा-ई-सेवा केंद्र, सेलू, दुधाटे महा-ई-सेवा केंद्र, पालम, पितळे महा-ई-सेवा केंद्र, पाथरी आणि शिवनेरी महा-ई-सेवा केंद्र सोनपेठच्या केंद्र चालक -कर्मचा-यांचासह सक्षम पोर्टलचे अमृत गोरे यांचाही समावेश होता.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थितांना दुर्धर आजारग्रस्तांसोबत सन्मानाने वागण्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसीलदार गणेश चव्हाण यांनी केले. तर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी उपसि्थतांचे आभार मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या