🍃मातीमध्ये रुजला...अन् एक विवाह मेघापर्यंत पोहोचला.....!


🌟पर्यावरणाची खोली जपून ऐतिहासीक उंचीवर हा सोहळा पोहोचला शिवस्मारक स्थळी🌟

*लेक दर्पण....✍️ राजेंद्र काळे 

विवाह म्हणजे, योग नावाच्या शिंपल्यात स्वाती नक्षत्राचं येणं.. विवाह म्हणजे, विणेवर झंकारणारं सुमधूर गाणं.. याच वैवाहिक झंकाराला सामाजिक पटलावर सांस्कृतिक प्रतिध्वनी लाभलातर येणारे सूर अन् उमटणारा स्वर हा मातीमध्ये रुजून मांगल्याच्या आभाळाला स्पर्श करणारा ठरतो, अन् होवून जातो संस्मरणीय वृक्षारोपण करत मूळारंभ झालेला सोहळा, जेंव्हा ६५ फूट उंचीवर संपन्न होतो.. तेंव्हा मातीत खोलवर रुजलेलं मांगल्य हे पुर्ततेच्या रुपानं नभांगणाची एक उंची गाठून जाते.

‘लग्न-लग्न-लग्न म्हणजे काय असतं?.. त्याच्या मनातील विचाराचं, तिच्या चेहर्‍यावरचं प्रतिबिंब असतं. प्रेमाचं बंधन असतं, दोन जीवांचं मिलन असतं.. विधात्याला पडलेलं, लग्न म्हणजे एक सुंदर स्वप्न असतं!’ मग याच स्वप्नाला सत्यात साकारतांना सामाजिकतेचा आकार दिलातर तो सोहळाही तेवढाच निर्वीकार ठरतो. असाच सोहळा झाला, ‘लेक माझी’ प्रतिक्षा हिचा. रविवार २१ एप्रिल रोजी. चि.संदीप यांचेशी विवाहबध्द झाली ती.. पर्यावरणाची खोली जपून ऐतिहासीक उंचीवर हा सोहळा पोहोचला शिवस्मारक स्थळी..

‘लेक माझी’चा गजर करणार्‍या निमंत्रण पत्रिकांची वैविध्यपुर्ण मालिका, प्रवेशद्वारावर स्वागतासाठी महाराष्ट्रभरातील नामवंत कवींच्या लेकीवरील गाजलेल्या कविता, प्रत्येक स्वागत फलक अन् कमानींवर ‘लेक माझी’चा संदेश, बोहल्यावरही ‘लेक माझी’ची सजावट, मेहंदी-हळदी-रांगोळी-सप्तपदी.. अशा वैवाहीक विधीत प्रत्येक ठिकाणी ‘लेक माझी’चा अनोखा जागर. लेकीविषयी सकारात्मक संदेश देणारा हा बहुचर्चीत विवाह!*

ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी ६.५० ला शिवस्मारकाच्या साक्षीने शिवविवाह झाला व मंगलाष्टक विवाह सोहळा निवांत वर फक्त अर्धातास चालला, ८ वाजेपर्यंत मुख्य सोहळा होऊन १० वाजेपर्यंत अडीच ते ३ हजार लोकांची भोजन व्यवस्थाही कुठलाही गोंधळ न होता आटोपलेली होती, अगदी शेगाव संस्थानचा आदर्श घेत अन्नाचे एकही शित खाली पडलेले दिसत नव्हते, एवढी स्वच्छता होती.. जेवनातही फक्त सहाच पदार्थ होते. दुपारी १२ वाजेपासून सुरू झालेल्या भेटीसाठी व प्रेमाच्या माणसांचा गोतावळा रात्री १२पर्यंत चालूच होता. सांगू नये, पण कशावरच फालतू खर्च नव्हता, अगदी नवरदेव-नवरीच्या कपड्यावरही.. या दोघांच्या लग्नाचा ड्रेस शालू व शेरवानी मिळून फक्त २० ते २५ हजार एवढ्याचाच. नवीन आलेले कपड्याचे प्रकार न वापरता पारंपारिक कपडे होते. आमच्या सर्वांचा मिळून फक्त ६० हजाराचा बस्ता झाला. अवघ्या एका तासात अतिशय साधा मेकअप करून नवरी आली होती. स्टेजही जे लॉनवाल्याचे होते तेच होते, त्यावरही वेगळ्या राजेशाही सजावटीचा खर्च नव्हता. आलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत ज्या गुलाब पुष्पांनी केल्या गेले, त्याच फुलांनी मान्यवरांचेही स्वागत झाले. सत्कार व स्वागत सोहळा तसेच आभार प्रदर्शन केवळ ५ ते ७ मिनीटात आटोपण्यात आले. फटाकेही फोडणार नव्हतो, पण हे कळाल्यावर वेळेवर एका डॉक्टर मित्राने ते पाठवल्यामुळे परस्पर फुटले. लेकराची हौस-मौज केली, पण उधळपट्टी नाही. पैशाची उधळण कुठेच नव्हती, उधळण होती ती फक्त साहित्यिक, सांस्कृतिक व शब्दधनाची. प्री-वेडिंग शुट सारखे प्रकार नवरदेव-नवरीलाच आवडत नव्हते, त्यामुळे स्क्रीनवर त्याचे वर्‍हाडाला न पाहू शकणारे प्रदर्शनही नव्हतेच..!_

मूळात लग्न म्हणजे ओसंडून वाहणारा आनंद, ओथंबून जाणारा जिव्हाळा, भरुनिया आलेले डोळ्यातून पोरीच्या सुखासाठी वाहणार्‍या सरी, त्यातून जिवांच्या डोळ्यांना लागणार्‍या धारा, लेकराच्या सुखासाठी चालणारा खटाटोप सारा.. असा गहिवरुन आणणार्‍या भाव-भावनांचे भावतरंग लहरत ठेवणारा अनुपम सोहळा म्हणजे लग्न, पण म्हणतात ना ‘लग्न पहावं करुन..!’ ते करून बघितलं, प्रचंड थकलो पण सर्वांच्या प्रेमाने थक्कही झालो. निवडणूक काळातच लग्न आल्याने दुप्पट काम वाढले होते, अनेक जणापर्यंत पत्रिकाही पोहोचवू शकलो नाही..पण खूप जण पत्रिकेची वाट पाहत न पाहता हजर झाले."कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई.." अशी ऋणनिर्देशाची भावना आता आहे.असा हा वृक्षारोपणाच्या माध्यमातून मातीत रुजला,अन् एका विवाहाचा मांगल्य सोहळा मेघापर्यंत पोहोचला.

▪️ सामाजिक "सूत्रात" बांधलेला..मंगल सोहळा :-

मंगळसूत्र, सामाजिक सूत्राच्या सोहळ्यातून बांधल्या जाते.. तेंव्हा तो विवाह ठरतो, एक मंगळ सोहळा. असा सामाजिक जाणिवेच्या सांस्कृतिक पटलावर झालेला सोहळा ठरला बहुचर्चीत!_

पत्रकारीता क्षेत्रात काम करत असतांना, एक सामाजिक जाणीव नेहमी ठेवल्यामुळे लेकीच्या विवाह सोहळ्याला साहित्यीक अन् सांस्कृतिक झालर चढवत पारंपारीकता अन् आधुनिकता हा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, मी लेक प्रतिक्षा हिच्या लग्नात २१ एप्रिलला. फुलांनी सजवलेल्या क्रेनमधून ६५ फुट उंचीवर जात वधु-वरांनी ऐकमेकांना वरमाला घातल्याने तो ऐतिहासीक ठरला. संगम चौकातील भव्यदिव्य शिवस्मारक स्थळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने 'चि.सौ.का. प्रतिक्षा व चि.संदीप' यांच्या वैवाहिक आयुष्याचा सूर्योदय झाला. पुतळ्याला पुष्पाभिषेक करत शिवसाक्षीने त्यांचा मुहूर्त साधण्यात आला. तर तिकडे निवांत लॉन्सवर 'लेक माझी'चा जागर करत भरगच्च गर्दीत मंगलध्वनीच्या गजरात साजरा झालेला पुढचा विवाह सोहळा संस्मरणीय ठरला.

स्वागतपथावर लावलेल्या लेकींविषयीच्या कवितांचे फलक लक्षवेधी होते, वृक्षारोपण करून हळद तर पक्षी तृष्णापात्रामध्ये 'एक लोटा जल' टाकून संगीत सोहळा.. हेही आधीचे पर्यावरणपूरक वैशिष्ट्य. डीजे.च्या ऐवजी सनई चौघड्याचा निनाद व बासरीची धून तथा शिवकालीन तुतारी, मशाल व मराठमोळ्या नऊवारीतील महिलांनी केलेले औक्षण लक्षवेधी होते. मतदान करून लोकशाहीच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन नवदाम्पत्याने  केले. कमी खर्चातही कल्पकता ठेवून विवाह सोहळा साजरा होवू शकतो, हे स्वकृतीतून सादर करता आले. सप्तपदीच्या प्रत्येक पावलात देण्यात आला तो, सामाजिक संदेश अन् वराने वधुला मंगळसूत्र घातले व सामाजिक सूत्रात बांधल्या गेला हा.. मंगल सोहळा...

 ✍️ राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या