💥राज्यात ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहीम राबविणार : पशुसंवर्धन विभागाचा युद्धस्तरावर प्रयत्न....!


💥नुकतीच या मोहिमेची राज्यभरात सुरुवात झाली असून 6  डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे💥

परभणी  (दि.10 नोव्हेंबर) : राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेच्या सहभागातून राज्यभर 'माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहीम राबविण्याचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला आहे. नुकतीच या मोहिमेची राज्यभरात सुरुवात झाली असून 6  डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

राज्यात 4 ऑगस्टपासून शासनाने गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेला विषाणूजन्य व सांसर्गिक लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनास लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. ऑक्टोबरअखेर एकूण 98 टक्के पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर बाधित पशुधनास शासनामार्फत मोफत औषधोपचार करण्यात येत आहे. लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाच्या पशुपालकास 100 टक्के राज्य शासनाच्या निधीमधून आर्थिक मदत देण्यात येत आहे.

तथापि, राज्यातील लम्पी चर्मरोग या सांसर्गिक रोगाचा प्रसार आणि त्या अनुषंगाने पशुधनाची मृत्यूची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व संशयित लम्पी चर्मरोगग्रस्त पशुरुग्णांची तपासणी, चाचणी, उपचार व लसीकरण, गोठ्याचे व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असे आदेश राज्याचे अवर सचिव डॉ. संजय डोईजोडे यांनी दिले आहेत.

या मोहिमेसाठी राज्यातील बाधित शहरे, गावे, वाड्या-वस्त्या, पाडे व तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लंपी चर्मरोग नियंत्रणासाठी पशुपालकांना जैवसुरक्षा उपाय व अनुषंगिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीमध्ये बाधित गावांमध्ये गाठीभेटी घेण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार करण्यात येणार असून, एका पथकामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अथवा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायत, नगर परिषद यांच्याकडील दोन स्वयंसेवक समवेत राहतील. पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देईल.

भेटीदरम्यान पशुपालकाचे नाव, त्यांच्या गोठ्यांमधील बाधित, अबाधित याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्र-अ मध्ये घेण्यात यावी. गोठाभेटीद्वारे पशूंमध्ये लम्पी चर्मरोगसदृश लक्षणे आढळल्यास पशुवैद्यकीय संस्थेमध्ये तत्काळ दाखल करावेत. गावकऱ्यांना लम्पी रोगप्रतिबंधासाठी उपाययोजनांचे प्रशिक्षण द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठित करून भेटीचे नियोजन करावे. पशुवैद्यकीय संस्थानिहाय पथके लससाठा, गोठ्यांची स्वच्छता, पशुधनाचे बाधित, अबाधित याबाबतची माहिती सोबत पशूंना दाखल करून उपचार तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, साहित्य वाटप करणे, लससाठा, गोठ्याची स्वच्छता, परिसर स्वच्छता, पशुधनाच्या शरीरावरील कीटकांचे व्यवस्थापन इत्यादीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी.

यासाठी आवश्यक कीटकनाशके व साधनसामग्री पुरवावी. लसमात्रा, औषधी, कीटकनाशके व इतर साधनसामग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात यावा. लोकप्रतिनिधी, ग्रामविकास, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, खासगी पशुचिकित्सक व सेवा दल यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेण्यात यावा. मोहिमेंतर्गत प्रोत्साहन म्हणून नमूद निकषांवर आधारित जिल्हानिहाय पुरस्कारांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना शासनामार्फत देण्यात आल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या