💥परभणी जिल्ह्यातील सेलू,जिंतूर रुग्णालयातील सुविधांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त....!


💥सेलू आणि जिंतूर येथील रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी गोयल यांनी समाधान व्यक्त केले💥


परभणी (दि.24 नोव्हेंबर) : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य यंत्रणेकडून वैद्यकीय सोयीसुविधा उत्तम आणि वाजवी दरात मिळाव्यात. यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज जिल्ह्यातील सेलू उप जिल्हा रुग्णालय आणि जिंतूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत यंत्रणेची तपासणी केली सेलू आणि जिंतूर येथील रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 


  उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर सुरवसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले, जिंतूरचे तहसीलदार सखाराम  मांडवगडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकिरण चांडगे, डॉ. शिवाजी हरकळ, डॉ. गजानन काळे आणि रुग्ण समन्वय समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

सेलू उपजिल्हा रुग्णालयातील मॉड्युलर आणि सामान्य कक्षातील शस्त्रक्रिया विभागाच्या अद्यावतीकरणाचे काम येत्या 10 दिवसात पूर्ण करण्याचे संबंधित एजन्सीला जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आदेश दिले. रुग्णालयातील प्रसुती गृह, प्रसूती पश्चात कक्ष, अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा, क्ष-किरण विभाग, एकात्मिक समुपदेशन केंद्र, अपघात विभाग, ऑक्सिजन प्लान्ट, 50 बेडचे फिल्ड हॉस्पिटल, शव विच्छेदन गृह आदींची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली. तसेच रक्त साठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. आतापर्यंत उपजिल्हा रुग्णालयाने घेतलेल्या रक्तदान शिबीर आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थींबाबतही त्यांनी आढावा घेतला.

येथे रोटेशन पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करुन दिव्यांग व्यक्तीवर उपचार करण्यात येतील. या ठिकाणी शक्य त्या सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे. या ठिकाणी 99 सिझेरियन ऑपरेशन झाले आहेत. येथून जिल्हा रुग्णालयात रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण कमी असल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

जिल्ह्यातील रुग्णालयांची साफसफाई करण्यासाठी शासनस्तरावरून एजन्सी नियुक्ती करण्यात येणार आहे. सेलू उप जिल्हा रुग्णालय तालुक्यातील नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे असून,  आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वैद्यकीय साधन सामुग्रीचा पुरेपूर वापर करून नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी संबंधितांना दिले. 

  येथील आरोग्य सुविधा समाधानकारक असून यामध्ये अधिक वाढ करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली आहे. येथील नागरिक देखील रुग्णालयाला पूर्ण सहकार्य करत आहेत. रुग्णवाहिका सुविधासाठी वाहनचालक नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून एक महिन्याच्या आत याबाबत निर्णय होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी रुग्णांचे नातेवाईक, नागरिक, पत्रकार यांच्याशी संवाद साधून येथील समस्या जाणून घेतल्या.

जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय साहित्य सामग्री खरेदीसाठी जिल्हा वार्षिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत निधी प्रदान करण्यात आला होता. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात साहित्य सामग्री खरेदी करून आरोग्य सुविधांची तपासणी जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन केली.  

जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक शस्त्रक्रियागृह पुढील 15 दिवसांत सुरु करून ते रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी संबधितांना दिल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून ती वाढविण्याचे आदेशही दिले. येथील क्षेत्रीय रुग्णालयाला भेट देत आरोग्य यंत्रणकेडून रुग्णांना पुरविण्यात येणा-या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच वालूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गंत येणाऱ्या उपकेंद्रामध्ये सुजाता गायकवाड या परिचारिकेने एप्रिलपासून आजपर्यंत तब्बल 170 प्रसूती केल्याबद्दल जिल्हाधिका-यांनी अभिनंदन केले. 

राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गंत हृदय शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची भेट घेतली. तसेच थॅलेसेमिया रुग्ण आणि रक्तदान शिबिराला भेट दिली. आज येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 66 पिशव्या जमा झाल्या. 

            या निधीतून जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य सामग्री खरेदी करून रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप यांना यापूर्वी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय व अस्थिव्यंग रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या वैद्यकीय साहित्यासह, मनुष्यबळ वापराबाबत त्या सलग तीन दिवसांपासून प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी करुन आढावा घेत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या