💥खांबेगावचा इतर ग्रामपंचायतींनी आदर्श घेतल्यास राज्यातील बालविवाहांचे प्रमाण घटेल - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची अंमलबजावणी करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत💥


परभणी (दि.23 नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील खांबेगाव ग्रामपंचायतीने 2 ऑक्टोबर रोजी बालविवाह प्रतिबंधात्मक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा ठराव घेतला असून, या ग्रामपंचायतीचा जिल्हा तसेच राज्यातील इतर ग्रामपंचायतींनी आदर्श घेतल्यास बालविवाहांचे प्रमाण नक्कीचे घटेल, असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला. खांबेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायतीला प्रशस्तीपत्र दिले. त्यावेळी श्रीमती गोयल बोलत होत्या. 


  उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) विशाल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत डॉ. संदीप  घोन्सिकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, पूर्णा तहसीलदार पल्लवी टेमकर, खांबगावच्या सरपंच श्रीमती मुक्ता कदम यावेळी उपस्थित होत्या. 

जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील सर्व सरपंच व ग्रामसेवक यांची ‘बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्त्व व जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये सर्व सहभागी सरपंच व ग्रामसेवक यांनी बाल विवाहासंदर्भात आपआपल्या गावांमध्ये कठोर भूमिका घेतील व मुलींचे शिक्षण व आरोग्य या बाबत सक्रिय काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 200 हून अधिक बाल विवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. मात्र माहिती अभावी त्याहून अधिक बाल विवाह झाले असण्याची ही शक्यता आहे. त्याकरीता नागरिकांनी जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी बालविवाह होत असल्यास त्याची माहिती तात्काळ चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 यावर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

त्यानुसार या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा ठराव घेणारी खांबेगाव ही जिल्ह्यातील पहिली ग्राम पंचायत ठरली असून, गांधी जयंती दिनी (2 ऑक्टो.) या ग्रामपंचायतीने ठराव घेतला. या ठरावानुसार मुला मुलींचा विवाह करण्यासाठी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयास वधू व वरांच्या वयाचा पुरावा सदर केल्याशिवाय गावात विवाह करता येणार नाही, असा ठराव घेतला आहे. ही बाब अत्यंत महत्त्वाची व कौतुकास्पद आहे. खांबेगाव ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाप्रमाणे जिल्ह्यातील तसेच राज्यातील ग्रामपंचायतीने ठराव घेतल्यास राज्यातील बाल विवाहाचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला. 

आपण गावातील बालविवाह थांबविण्याच्या दृष्टीकोणातून केलेले कार्य हे समाजासाठी आदर्श उदाहरण असून यातून प्रशासनाने बालविवाह विरोधात सुरू केलेल्या मोहिमेला प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी या नात्याने खांबेगाववासीयांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांनी अभिनंदनपर प्रशस्तीपत्र देवून खांबेगाव वासीयांचे अभिनंदन केले. 

प्रास्ताविकात खांबेगावच्या सरपंच मुक्ता कदम यांनी मुलाचे 21 आणि मुलीचे 18 वर्षे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीमध्ये सादर केल्याशिवाय विवाह होऊ देणार नसल्याचा सर्व समंतीने ठराव घेतल्याचे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी कैलास तिडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते यांनीही यावेळी समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी गावातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती......

सौंजन्य : जिल्हा माहिती कार्यालय परभणी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या