💥अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपची पराभवाच्या भितीने माघार....?


💥उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके बिनविरोध निवडून येणार💥

✍️मोहन चौकेकर

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षानं माघार घेतली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील घोषणा केली आहे. ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपनं मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. तर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती. मात्र, आता अचानक भाजपनं निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती निवडणूक लढवत असेल तर निवडणूक लढवू नये अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. तशीच भूमिका भाजपनं घ्यावी, असं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल मुंबईत बोलताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ऋतुजा लटके यांना मिळणारा कालावधी पाहता निवडणूक होऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला निवडणुकीपासून परावृत्त करावं, असं शिंदे गटातील काही आमदारांचंही म्हणणं होतं. त्यामुळं भाजपवर दबाव वाढत चालला होता. अखेर आज भाजपच्या नेत्यांनी या संदर्भात बैठक घेतली व माघार घेण्याची घोषणा केली.

* मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत :-

मुरजी पटेल अपक्ष निवडणूक लढतील का, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. भाजपचा उमेदवार कधी पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. त्यामुळं एकदा पक्षाचा निर्णय झाला की त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा प्रश्नच नाही, असं चंद्रशेखर  बावनकुळे यांनी स्पष्ट केलं....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या