💥महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर.....!


💥दिवाणी कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची जाहिरात जानेवारी 2023 मध्ये येणार आहे💥

परभणी (दि.27 आक्टोंबर) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून, आयोगामार्फत आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असल्याचे आयोगाचे सह सचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे राज्य लोकसेवा आयोगाकडून  सन 2023 मध्ये विविध पदांसाठीच्या घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षा जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.

दिवाणी कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची जाहिरात जानेवारी 2023 मध्ये येणार आहे. त्याची 19 मार्च रोजी परीक्षा होईल व मे महिन्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब व गट क सेवा संयुक्त परीक्षेची जाहिरात जानेवारीमध्ये प्रकाशित होणार आहे. या अंतर्गंत येणा-या पदांची 30 एप्रिल रोजी परीक्षा तर जून 2023 मध्ये निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब सेवा मुख्य परीक्षा ही 2 सप्टेंबर रोजी तर निकाल ऑक्टोबर 2023 मध्ये जाहीर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला तर निकाल नोव्हेंबरमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा 10 सप्टेंबरला तर निकाल नोव्हेंबरमध्ये घोषित होणार आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी 2023, परीक्षा 4 जून आणि निकाल जुलैमध्ये जाहीर होईल. 33 संवर्गांचा समावेश असलेल्या या पदाची मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर 2023 ते 1, 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला आणि निकाल जानेवारी 2024 मध्ये घोषित होईल. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबरला आणि निकाल डिसेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबरला आणि निकाल डिसेंबर 2023 मध्ये घोषित होईल. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा ही 15 ऑक्टोबरला होणार असून, डिसेंबर 2023 मध्ये निकाल घोषित होईल. सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर तर निकाल डिसेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याचा अंदाज आहे.

अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला आणि निकाल डिसेंबर 2023 मध्ये घोषित केला जाऊ शकतो. तसेच महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ही 4, 5, 6 आणि 7 नोव्हेंबर 2023 मध्ये होण्याचा अंदाज असून, या पदांसाठी घेण्यात येणा-या परीक्षेचा निकाल जानेवारी 2024 मध्ये घोषित होण्याचा अंदाज आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविला आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या