💥पुर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसह कर्जबाजारीपणाने घेतला शेतकऱ्याचा बळी...!


💥तालुक्यातील गौर येथील भिकाजी व्यंकटराव जोगदंड या शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या💥

पूर्णा (दि.१८ आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यात सर्वत्र झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान व कर्जबाजारीपणामुळे आता कर्ज फेडायचे कुठून या चिंतेत वैफल्यग्रस्त होवून सातत्याने तणावात असलेल्या तालुक्यातील गौर येथील शेतकरी भिकाजी व्यंकटराव जोगदंड वय ४३ यांनी गळफास घेत आपले आयुष्य संपवल्याची अत्यंत हृदयविदारक घटना आज मंगळवार दि.१८ आक्टोंबर रोजी घडली.

         तालुक्यातील गौर येथील अल्पभुधारक शेतकरी भिकाजी जोगदंड यांना साडेतीन एकर शेती आहे. मुलगा,पत्नी व ते रोजंदारीवर मजूरी करून घरसंसार चालवत होते. त्यांच्या नावावर भारतीय स्टेट बॅंकेचे नव्वद हजार व मुलाच्या नावावर साठ हजार कर्ज आहे. त्यातच मुलीच्या लग्नात खर्च झाला होता व सातत्याने पडणाऱ्या पाऊसामुळे त्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. दरम्यान मागील चार दिवसापासून तर खूपच पाऊस पडत असल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आज मंगळवार दि.१८ आक्टोंबर रोजी पत्नी व मुलगा रोजंदारीच्या कामाला गेले होते तर मुलगी प्रगती ही परिक्षेस गेली होती.घरी कोणीही नव्हते दुपारी ०१-०० वाजता त्यांनी घराच्या पत्राच्या गजाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. मुलगी प्रगती परिक्षेहून आल्यावर तीला दरवाजा आतून बंद असल्याचे व दार कोणीही ऊघडत नसल्याचे लक्षात आले.शेजारच्या घराच्या छतावरून उतरून आत पाहिल्यावर घटना ऊघडकीस आली. दरम्यान मुलगा शिवम याने चुडावा पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद मुळे व सूर्यकांत केजगीर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या