💥सामाजिक न्याय विभागाचा स्थापना दिवसाचा 90 वा वर्धापन दिन साजरा.....!


💥राज्यातील वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाकरिता 15 ऑक्टोबर 1932 रोजी सामाजिक न्याय विभागाची स्थापणा💥

परभणी (दि.18 आक्टोंबर): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून राज्यातील वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाकरिता 15 ऑक्टोबर, 1932 रोजी बैकवर्ड क्लास वेल्फेअर डिपार्टमेंटची म्हणजेच आजच्या राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्थापना करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेस 15 ऑक्टोबर 2022 रोजी 90 वर्ष पूर्ण झाल्याने त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन राज्यात साजरा करण्यात आला.

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परभणी येथील सभागृहात सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2022 रोजी सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा आला.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती श्री. शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपति शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माजी राष्ट्रपति डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गीता गुठ्ठे या उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पाथरी बालासाहेब सामाले हे उपस्थित होते. तसेच आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेशी संलग्न असलेल्या अर्चनाताई घनवट, गंगालाई दशरथे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एल.एस. गायके, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक यांनी सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेपासून आजतागायत 9 दशकांची वाटचाल विषद केली.

कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्यातील तुरा ता.पाथरी येथील 10 ऊसतोड कामगारांना ग्रामसेवक गोविंद देशमुख यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्रे वितरीत करण्यात आली. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत प्रातिनिधीक स्वरुपात जिल्हयातील 3 विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी तुरा ता. पाथरी येथील ऊसतोड कामगार वसंत तुकाराम शेळके यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करुन ऊसतोड कामगारांना शासनामार्फत वैद्यकीय उपचार आरोग्य सुविधा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच तुरा ता.पाथरी येथील ग्रामसेवक गोविंद देशमुख यांनी ऊसतोड कामगारांच्या समस्या जवळून पाहिलेल्या असून आपल्याकडील ऊसतोड कामगार हे ऊसतोडीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात त्यामुळे त्यांची नोंदणी करणेकामी देखील अडचणी निर्माण होतात. तसेच शासनाकडून ऊसतोड कामगारांसाठी वैद्यकीय उपचारासाठी मदत दिली जावी असे मत व्यक्त केले.

यावेळी श्री. सामाले तसेच आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेशी संलग्न असलेल्या अर्चनाताई घनवट, गंगाताई दशरथे यांनी या प्रसंगी सामाजिक न्याय विभागातील अधिकारी,कर्मचारी हे मागासवर्गीयांसाठी करत असलेल्या कामकाजाचे कौतुक करुन सामाजिक न्याय विभागातील कर्मचा-यांची कार्यालयीन कामकाजाची क्षमता व गुणवत्ता अधिक वाढावी यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी तणावमुक्त राहुन कार्यालयीन कामकाज करणे आवश्यक असून त्यासाठी तणावमुक्त जीवनशैली अंगीकारणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय समारोपात श्रीमती गुठ्ठे यांनी सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीयांसाठी राबवित असलेल्या विविध योजनां विषयी माहिती देऊन ऊसतोड कामगारांच्या समस्यांची दखल शासन स्तरावर घेण्यात आली असून ऊसतोड कामगारांसाठी लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आलेली असून सदर महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगारांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी सुरुवातीला ऊसतोड कामगार कोण आहेत व किती आहेत हे स्पष्ट होण्यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन शासनामार्फत त्यांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असून सदर महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक योजना प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

यावेळी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती तथा वाचन प्रेरणा दिवसही साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येकाने दररोज वाचनासाठी अर्धा तास दिला पाहीजे असे प्रतिपादन श्रीमती गुठ्ठे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी  एस.डी. शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर.बी.वजीर यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या