💥भक्ती हा पुरुषार्थ अधिक सहज व सोपा आहे - डॉ. विजय शेडगे


💥तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' 12 वे पुष्प संपन्न💥

दिनांक : 15 सप्टेंबर 2022, 

वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प 15 सप्टेंबर 2022 या दिवशी अगस्ती महाविद्यालय अकोले, जिल्हा अहमदनगर येथील तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय शेडगे यांनी गुंफले. डॉ. शेडगे यांनी 2003 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. बळीराम शुक्ल यांच्या मार्गदर्शनात "संत ज्ञानेश्वरांच्या विशेष संदर्भात संत साहित्यातील भक्ती संकल्पना" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन त्यांनी 'संत ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग' या विषयावर आपले व्याख्यान दिले.

डॉ. शेडगे यांनी आपल्या व्याख्यानातून, संत साहित्याचे महत्त्व उलगडून सांगत असताना विविध पंथ आणि संप्रदायाची ओळख करून दिली. त्याचबरोबर त्यांनी मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत सावता महाराज, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत कबीर, संत जनाबाई यांच्या अभंगातील भक्ती विषयक विचारही श्रोत्यांसमोर प्रस्तुत केले. 

संत संप्रदायाचा अभ्यास करीत असताना किंबहुना धर्मचिंतनाचा अभ्यास करीत असताना संत कोणाला म्हणावे ? भक्त कोणाला म्हणावे ? भक्ताचे लक्षण कोणते ? भक्ती कशी करावी ? अद्वैत म्हणजे काय ? आत्मा आणि परमात्म्याचे मिलन म्हणजे काय ? असे काही सामान्य प्रश्न उपस्थित होतात. अशा या सर्व प्रश्नाला अनुसरून संतांनी जे उत्तर दिले आहे त्याविषयीचे विवेचन सुद्धा डॉ. विजय शेडगे यांनी आपल्या व्याख्यानातून केले. 

ज्ञानदेवाने भक्तीला पाचवा पुरुषार्थ मानले आहे. त्याविषयी विवेचन करताना डॉ. विजय शेडगे यांनी भारतीय दर्शनामध्ये मोक्षला अनुसरून जो मार्ग वा ज्या पद्धती सांगितल्या जातात त्यामध्ये काय काठीण्यता आहे याकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले आणि त्या अंतिम मानल्या जाणाऱ्या 'मोक्ष' या पुरुषार्थाच्या तुलनेमध्ये 'भक्ती' ही किती सहज आणि सोपी आहे हे त्यांनी ज्ञानदेवाच्याच अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केला.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व इतर राज्याच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या