💥सेलूतील दहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पसार झालेले दोन नराधम पोलिसांच्या ताब्यात...!


💥जिंतुर तालुक्यातील राजेगाव शिवरातून दोन्ही नराधमांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह घेतले ताब्यात💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

जिंतूर (दि.०७ सप्टेंबर) - आज बुधवारी दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास चारठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजेगाव शिवारातुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. दि.५ सप्टेंबर रोजी सेलू येथील १० वर्षीय चिमुकली आणि तिच्या भावास दोन नराधमांनी फूस लावून आपल्या दुचाकीवर बसून वालूर मार्गे कौसडी येथे आल्यानंतर त्यांनी चिमुकलीच्या भावास फाट्यावर सोडून दिले. त्यानंतर दोन्ही नराधमांनी पीडित चिमुकलीवर कोक परिसरात नेऊन जबरदस्तीने अत्याचार करुन माणुसकीला काळिमा फासणारी घटना केली. दरम्यान, सदर प्रकरणी सेलू पोलिसात गुन्हा दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमाका सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी गोफने, स्थागुशा पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक दंतुलवार, सपोनि मुळे चारठाणा पोलीस ठाण्याचे साहयक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड आदींनी आरोपितांचा शोध घेण्यासाठी बोरी आणि जिंतूरच्या परिसरात अवघ्या पोलीस प्रशासनाला कर्तव्यावर लावले होते.


मागच्या दोन दिवसापासून जिवाचे रान करुन जिंतूर आणी बोरी येथे तर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्याने मोठ्या प्रमाणात गस्त वाढविली होती. घटनेनंतर पसार झालेले आरोपी जिंतूर आणि बोरी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली. गुपित माहितीच्या साहाय्याने पो.ना पांडुरंग तूपसुंदर मुकेश बुधवंत यांनी मोठ्या शिताफीने जिंतुर तालुक्यातील राजेगाव शिवरातून दोन्ही नराधमांना गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. आरोपी तालुक्यातील मानमोडी येथील रहिवाशी असल्याचे समजते. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी सेलू पोलीस ठाण्यात नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दोन दिवसांपासून जीवाचे रान करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीला अखेर यश आले आहे.

सदरील प्रकरणात आरोपी पकडण्यास ज्या गावकऱ्यांनी मदत केली त्या गावकऱ्यांचा जिंतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून सत्कार केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या