💥पुर्णा तालुक्यात जनावरांना होणाऱ्या लम्पी त्वचा रोग या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युध्द पातळीवर सज्ज....!


💥पशुधन विकास अधिकारी डॉ.राहुल कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली लंपी त्वचा रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू💥

महाराष्ट्रात जनावरातील लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे महाराष्ट्रात सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करण्यात येत आहे. पुर्णा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना कावलगाव श्रेणी -१ अंतर्गत देखील लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दि.२० सप्टेंबर रोजी  कावलगांव ,चांगेफळ , पिंपरण, आलेगांव,कलमुला व दि.२१ सप्टेंबर रोजी सोन्ना, कावलगांववाडी,रुंज इ. गावांमध्ये लंपी स्कीन डिसीज विषाणूचा प्रतिबंधात्मक प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.  पशुवैद्यकीय दवाखाना कावलगाव श्रेणी -१ अंतर्गत येणाऱ्या सोन्ना गावांमध्ये जनावरातील लंपी त्वचा रोगाचे लसीकरण तपासणी करणाऱ्या पथकाने भेट दिली. लसीकरण तपासणी पथकामध्ये  डॉ. कल्पना मुंगळीकर (पशुसंवर्धन उपायुक्त पुणे) डॉ. पी. पी. नेमाडे (जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त परभणी)  डॉ. नामदेव आघाव (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी परभणी) डॉ. अरुण देशपांडे  ( पशुसंवर्धन सहायक आयुक्त,पुणे) डॉ. श्रीनिवास कारले (पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, पुर्णा ) डॉ. माने ( प. वि.अ, पुणे) इ. पशुसंवर्धन विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. 

पशुवैद्यकीय दवाखाना कावलगांव श्रेणी -१ अंतर्गत येणाऱ्या सोन्ना  गावामध्ये लंपी त्वचारोग जनजागृती उपक्रम राबविला.  ह्या उपक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच शरद कदम हे होते.ह्या उपक्रमांतर्गत लंपी त्वचा रोग प्रतिबंधक उपाय जसे की, जनावरांचे गोठे फवारणी, गावात धुर व नाली फवारणी , मॄत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी उपाय योजना, दुध सुरक्षित आहे याबद्दल प्रचार , लंपी त्वचारोग हा जनावरांपासून माणसांना होत नाही ह्याबददल प्रसार इ. उपाययोजनाबद्दल डॉ.मुंगळीलकर, डॉ.नेमाडे,डाॅ.आघाव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

जनावरातील लंपी त्वचा रोगाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. राहुल कसबे यांनी सांगितले की, लंपी स्कीन डिसीज हा जनावरातील विषाणूजन्य चर्मरोग असल्याने या रोगाचा प्रसार  रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरोगी जनावरांना (गोट पॉक्स व्हॅक्सीन )वापरून कावलगाव परिसरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली .लंपी त्वचा रोग हा जनावरांतील विषाणूजन्य चर्मरोग आहे . याचे जंतू देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स वर्गात मोडतात. मुख्यत्वे या विषाणूचा प्रसार हा चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सिस),डास ,गोचीड, चिळटे यांच्यामार्फत होतो .तसेच यात अंगावर फोड येणे, फोड फुटणे, पायावर किंवा पोळीवर सूज येणे, चारा न खाणे, ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोठ्याचे निर्जंतुकीकरण तसेच वेगळीकरण करावे, यासाठी 40 मिली निम तेल किंवा कडू लिंबाच्या पाल्याचा रस तसेच 40 मिली करंज तेल व 50 ग्राम अंगाची साबण यांचे मिश्रण करून गोठा व जनावरांवर फवारणी करावी असे डॉ. कसबे यांनी सांगितले.

ही लसीकरण मोहीम पार पाडण्यासाठी डॉ.श्रीनिवास कारले (पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त, पुर्णा ) डॉ. शिवाजी बुचाले (प.वि.अ , पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ चुडावा) यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच डॉ. सुर्यकांत कदम ( आंतरवाशियता विद्यार्थी, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर) व संतोष सुर्यवंशी, गजानन मुळे, दत्ता पारवे, विष्णू कदम, गोपाळ भोसले,कैलास ढोणे, आकाश कापुरे ,सिध्दार्थ कापुरे,कपिल सरवदे व इतर  पुर्णा तालुक्यातील सर्व सेवादात्यांनी मदत केली ही मोहीम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सोन्ना गावचे सरपंच शरद कदम व गावातील शेतकरी ह्यांनी देखील विशेष सहकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या