💥परभणीत ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ सोहळा धुमधडाक्यात....!


💥जिल्हाधिकारी कार्यालय : देशभक्तीपर घोषणांनी आसमान दुमदुमले💥

परभणी (दि.११ आगस्ट) :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत आयोजित केलेल्या तीन दिवशीय विविध उपक्रमांसह कार्यक्रमांच्या ‘जल्लोष स्वातंत्र्याचा’ उद्घाटकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (दि.11)  सायंकाळच्या नयनरम्य व देशभक्तीने पूर्णतः भारावलेल्या वातावरणात, प्रचंड जयघोषणासह जल्लोषात शेकडो मान्यवरांसह हजारो विद्यार्थ्यांच्या साक्षीने मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली.


          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी या गौरवशाली पर्वानिमित्त सर्वसामान्य जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची जाज्ज्वल्य भावना कायमस्वरुपी मनात रहावी व त्याचे स्मरण व्हावे, या उद्देशाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधी स्वराज्य महोत्सवात जिल्हा प्रशासनाने अन्य यंत्रणा व शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम व  सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

           या उपक्रमाचे गुरुवारी (दि.11) सायंकाळी साडेसहा वाजता आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याहस्ते, जिल्हाधिकारी आंचल गोयल, औरंगाबादचे पोलिस अधिक्षक निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर, ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी व छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी तसेच अन्य स्वांतंत्र्य सैनिकांची हुबेहुब वेशभूषा साकारणारे कलावंतही विराजमान होते.  या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अनोख्या पध्दतीने दीपप्रज्वलन, मशाल प्रज्वलीत करीत मोठ्या धुमधडाक्यात सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी शेकडो मान्यवरांसह हजारो विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी  महाराज की जय’ असा जयघोष केला. तेव्हा जयघोषाने अक्षरशः आस्मान दुमदुमले. संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या चैतन्याने भारावून गेले.  फटाक्यांची आतिषबाजी, रंगी बेरंगी फुगे लक्षवेधी ठरले.

          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारापासून प्रांगणातील व्यासपीठापर्यंत डोलाने फडकणारे तिरंगी झेंडे, व्यासपीठासह इमारतीवरील सुंदर अशी रोषणाई, सजावट, व्यासपीठासमोर कलावंतांनी साकारलेल्या एका सरस एक रांगोळ्या, सनई-चौघड्यांच्या सुमधूर स्वरांनी या अमृत महोत्सवाच्या उद्घाटकीय सोहळ्यास चार चाँद लावले.

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी उद्घाटकीय भाषणातून भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सर्व नागरीकांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्य हे हजारोंच्या बलीदानाने, संघर्षाने मिळालेले आहे. हे स्वातंत्र्य बहुमूल्य असे आहे. त्या स्वातंत्र्याचे संगोपण करणे प्रत्येकाचे काम आहे, असे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आवाहन केलेल्या प्रमाणे ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमास नागरीकांनी भरघोष प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या या सोहळ्याचेही भरभरुन असे कौतूक केले. सूत्रसंचालन अनिकेत सराफ व सुनील तुरुकमाने यांनी केले

💥पोलिस दलाच्या बॅन्डची धून ठरली लक्षवेधी :-

            या उद्घाटकीय सोहळ्याच्या प्रारंभी जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस बॅन्ड पथकाने देशभक्तीपर गीतांची सुंदर अशी धून सादर केली. ‘सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ता हमारा’, ‘जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहामंगले शिवास्वदे शुभदे’ या गीतांच्या सुंदर अशा सादरीकरणास शेकडो मान्यवरांसह हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.

💥प्रश्‍न मंजूषाचा कार्यक्रम लक्षवेधी...

          या उद्घाटकीय सोहळ्याच्या प्रारंभी सारंगस्वामी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रश्‍नमंजूषा कार्यक्रम आयोजित केला होता. यातून विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या अनुषंगाने विविध प्रश्‍न विचारण्यात आले. क्षणार्धात विद्यार्थ्यांनी या प्रश्‍नांची अचूक उत्तरे दिली व टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी या विद्यार्थ्यांचे कौतूक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या