💥परभणी शहरासह जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक....!


💥शेतकरी संघटनेने वेधले जिल्हा प्रशासनाचे लक्ष : शिस्त लावण्याची मागणी💥

परभणी (दि.29 आगष्ट) : परभणी शहरासह जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहनांद्वारे अत्यंत धोकादायक पध्दतीने वाहतूक सुरु आहे. त्यावर कोणाचेही कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नाही, असा आरोप शेतकरी संघटनेने केला असून जिल्हा प्रशासनाने तातडीने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूकीवर लक्ष केंद्रीत करावे व सुरक्षित वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना अवलंबवाव्यात, अशी मागणी केली आहे.

           शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत शिंदे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भागवत जावळे, तालुकाध्यक्ष शिवाजी बोबडे, सुनील कदम, अमोल तरवटे, सय्यद जामकर, बन्सीधर घुले, बाळासाहेब लाड, रमेश कोके, बालासाहेब शेळके, बालासाहेब कदम, माणिकराव रणेर आदींनी जिल्हा प्रशासनास या विषयाच्या अनुषंगाने एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्यातून अनेक गोष्टींवर प्रकाशझोत टाकला.

             परभणी शहरात खाजगी शाळांची संख्या खूप जास्त वाढलेली असून विद्यार्थ्यांचीही संख्याही लक्षणीय आहे. हे विद्यार्थी रियर ऑटो, मिनी व्हॅन, मिनी बस आदी वाहनांद्वारे नियमित शाळेत ये-जा करीत असतात. परंतु, सदर वाहनांच्या चालकांद्वारे सध्या मनमानी कारभार सुरु असून कुणाचेही यावर नियंत्रण नाही. विशेष म्हणजे या वाहनांच्या फिटनेसच्या कार्यक्षमतेबाबत कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. ही वाहने कुणीही विना पूर्व परवानगी अथवा परिपूर्ण प्रशिक्षणाविना चालविली जात आहेत.  बाहेर जिल्ह्यातून अथवा आपल्याच जिल्ह्यात पूर्वी वारपलेल्या गाड्यांद्वारे कुणीही हा व्यवसाय सुरु करीत आहे. कहर म्हणजे या वाहनांच्या चालकांद्वारे अती जलदगतीने वाहने चालविली जात आहेत. परिणामी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे चालक हा नोंदणीकृत असणे व त्यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.

           दरम्यान, शाळांशी या संबंधी चर्चा केली असता शाळेकडूनही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही. “विद्यार्थ्यांना शाळेत कसे आणून सोडायचे? हा तुमचा वैयक्तिक प्रश्‍न आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पहा, यात आमचा काहीही संबंध नसतो”, अशा प्रकारची उत्तरं शाळेच्या वतीने पालकांना दिली जात आहेत. यावर पालकांनी नेमकं करावं तरी काय? असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.  त्यामुळे या सर्व बाबींवर योग्य असे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे, असेही या संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

💥मनमानी पध्दतीने भाडे आकारणी :-

           विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी किती अंतरास किती भाडे आकारायचे हे या चालकांद्वारेच ठरविल्या जात आहे. "तुम्हाला पटत असेल तर तुमच्या पाल्यास वाहनाद्वारे पाठवा अन्यथा तुम्हीच त्यांना शाळेत सोडा" या तत्वावरच हे काम चालू आहे. परिणामी सर्वसामान्य पालकांना नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

💥क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक :-

           या खाजगी वाहनातून वाहतूक करतांना विद्यार्थ्यांची संख्या अनियंत्रित असते. प्रत्यक्ष वाहन पासींग करतेवेळेस मान्य असलेली संख्या सोडून ऑटो किंवा मिनी व्हॅनमध्ये दुपटीपेक्षा जास्त विद्यार्थी अक्षरशः कोंबून बसविले जातात. विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची व घरी येण्याची वेळ निश्‍चित राहत नाही.  शाळा  भरण्यापूर्वी एक ते दीड तास लवकर व शाळा सुटल्यावर एक ते दीड तास जास्त असा प्रवास या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनात विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत नियंत्रण असणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या