💥मी शिवसेनेचा जिल्हा प्रमूख आहे आणि मीच राहणार - आ.संतोष बांगर


💥शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने मी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे💥

शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना बंडखोर  आमदार संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आलं आहे. मात्र या कारवाईनंतरही मीच अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, असं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

काल शिवसेनेने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवलं आहे. परंतु मला जिल्हाप्रमुख पदावरून काढण्यात आलेलं नाही, मीच अजूनही शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने मी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिलं आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे  यांचा एकनिष्ठ शिवसैनिक आहे, असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला आहे.


संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होत पक्षाशी बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्याची मागणी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे पक्षातील जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतर रविवारी आमदार संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख या पदावरून काढण्यात आल्याची माहिती दिली.

सेनेचा जिल्हाप्रमुख बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्यासाठी शिवसेनेतील तीन ते चार पदाधिकारी मुंबईत ठाण मांडून आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या दोनच दिवसात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्ह्याचा नवीन जिल्हाप्रमुख जाहीर करणार आहेत. आता शिवसेनेला हिंगोलीत नवीन जिल्हाप्रमुख कोण मिळेल याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

संतोष बांगर हे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान सुद्धा केलं होतं. मात्र बहुमत चाचणीआधी त्यांनी अचानक बंडखोरी केली. त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे अनेकांना धक्का बसला होता.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोर आमदार ज्यावेळी गुवाहाटी येथे पोहोचले होते, तेव्हा आमदार संतोष बांगर आक्रमक दिसले होते. त्यांनी या बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन देखील केलं होतं. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं त्यांनी दाखवलं होतं. मात्र नंतर अचानक ते स्वतःच शिंदे गटात सामील झाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या