💥श्री.संत महंमदखान महाराज गणोरी पालखीचे शुक्रवारपेठेत भव्य स्वागत....!


💥राजुआप्पा गंगाळे यांनी पालखीतील वारकर्‍यांची केली भोजनसेवा💥

फुलचंद भगत

वाशिम - विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील गणोरी गावचे गजानन महाराज भक्त संत महंमदखान महाराज यांची पालखी गेल्या १६ वर्षांपासून पंढरीची वारी करत आहे. पंढरपुर येथे जाण्यासाठी गणोरी येथून मजल दरमजल करत ही पायदळ यात्रा वाशिममध्ये पोहोचल्यानंतर १७ जुन रोजी शहरातील शुक्रवारपेठ भागातील गजाननभक्त राजुआप्पा गंगाळे यांच्या आयोजनातुन त्यांच्या निवासस्थानी पालखीला भोजनासाठी विसावा देण्यात आला.

    ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत विठ्ठलनामाचा गजर करीत गणोरी येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत महंमद खान महाराज संस्थानच्या पालखीचे गंगाळे परिवार व परिसरातील भक्तमंडळीच्या वतीने पुजन करण्यात आले व वारकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सामुहिक आरती घेण्यात आली. पालखीतील वारकर्‍यांनी अपुर्व असा किर्तनाचा कार्यक्रम करुन परिसरातील लोकांना भक्तीरसात न्हावू घातले. यावेळी राजु गंगाळे, निखिल सदावर्ते, प्रमोद भुकणे, विलास गंगाळे, प्रमोद गंगाळे, विशाल कोष्टी, संजय खेलुरकर, साबाप्पा सदावर्ते, वैभव गंगाळे, प्रशांत कोकणकर, विरशैव लिंगायत समाज बांधव, बाळसमुद्र प्रतिष्ठान आणि मित्रमंंडळाच्या वतीने पालखीतील वारकर्‍यांचे हार घालुन स्वागत करण्यात आले. महिला भगिनींसह हजारो भाविकांनी श्री संत महंमदखान महाराजांच्या पालखीचे सश्रद्ध भावनेने दर्शन घेतले. गजाननभक्त राजु गंगाळे हे दरवर्षी श्री संत महमंदखान महाराजांच्या पालखीतील वारकर्‍यांना भोजन देत असतात. मागील दोन वर्षी कोरोनामुळे पालखी सोहळा रद्द झाला होता. त्यामुळे भक्तांमध्ये उदासिनता पसरली होती. मात्र यावर्षी या पालखीचे शहरात आगमन झाल्यानंतर भाविकांच्या चेहर्‍यावर आनंद पसरला होता.

    शहरात आगमन झालेल्या या पालखी सोहळयात पांढर्‍याशुभ्र पोशाखातील भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते. यात तरुणांचा सहभाग उल्लेखनीय होता. श्री गजानन महाराजांच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळयांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात भाविक तेवढेच तल्लीन होऊन ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पुढे येत होते. पालखीच्या स्वागतासाठी स्थानिक भाविकांनी आपापल्या घरासमोर रस्त्यावर सडासंमार्जन करून सुरेख रांगोळी रेखाटल्याचे दिसून आले.

    स्वागत व किर्तनानंतर पालखीतील वारकर्‍यांना भोजन देण्यात आले. यावेळी १५० वारकर्‍यांसह परिसरातील मिळून जवळपास ५०० लोकांनी भोजनाचा लाभ घेतला. या भोजन कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त, महिला भगिनी, युवक, युवती व बालकांसह बाळसमुद्र प्रतिष्ठान, विरशैव लिंगायत समाज बांधव व मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेवून हा कार्यक्रम शांततेत पार पाडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या