💥धर्मकिर्ती हा समन्वयवादी तत्त्वज्ञ आहे - डॉ. लता छत्रे

 


💥गोटे महाविद्यालयाच्या 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' आठवे पुष्प संपन्न💥

💥(आजादी का अमृत महोत्सव आणि बुद्ध पौर्णिमा विशेष)💥

मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे आठवे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख तथा बौद्ध तत्त्वज्ञानाच्या अभ्यासिका डॉ. लता छत्रे यांनी गुंफले. डॉ. लता छत्रे यांनी 1985 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. एम. पी. मराठे यांच्या मार्गदर्शनात " धर्मकीर्तिस फिलोसोफी : ए फ्रेश स्टडी" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 में 2022 या दिवशी त्यांनी 'धर्मकीर्ति यांचे तत्त्वज्ञान' या विषयावर आपले व्याख्यान दिले.

डॉ. छत्रे यांनी आपल्या व्याख्यानातून, गौतम बुद्धाने केलेले उपदेश, त्या उपदेशाचे झालेले संकलन आणि त्यावर झालेले भाष्य यावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी त्रिपीटिकांचा आधार घेत बौद्ध दर्शनकार नागार्जुन, वसूबंधू आणि दिग्नाग यांनी कशा पद्धतीने बुद्धांच्या विचाराला आकार दिला हे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच बरोबर त्यांनी धर्मकिर्तिच्या दृष्टिकोनातून या तिन्ही तत्त्ववेत्त्यांच्या विचाराची समीक्षा करीत धर्मकीर्ति याने नेमके काय तत्त्वज्ञान सांगितले हे उपस्थितांसमोर मांडले. त्यात प्रामुख्याने धर्मकीर्ति बाह्य जगताकडे कशा पद्धतीने पाहतो. त्याने प्रत्यक्ष आणि अनुमान या प्रमाणांच्या संदर्भात जी भूमिका मांडली आहे ती कशाप्रकारे इतरांपेक्षा वेगळी आहे. अशा अनेक विषयांचा उलगडा करीत असताना धर्मकीर्ति हा बौद्ध दर्शनातला एक समन्वयवादी तत्त्वज्ञ आहे; याविषयीचा संकेत डॉ. छत्रे यांनी या प्रसंगी केला. 

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी त्यांनी सध्या भारतामध्ये आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय तत्त्ववेत्यांच्या विचारांचा जागर  करण्याच्या हेतुने आजचे हे व्याख्यान महत्वाचे असल्याचे सांगितले. याशिवाय याच महिन्यामध्ये बुद्धपौर्णिमा असल्याकारणाने बुद्धाच्या विचारांना व्यवस्थित आकार देणाऱ्या 'धर्मकीर्तिचे तत्त्वज्ञान' या विषयावर होऊ घातलेले हे व्याख्यान वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे ही त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्रच्या बहेरिल विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या