💥परभणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आदेशानंतर अवैध सावकाराने बळकवलेली जमीन केली शेतकऱ्यास परत...!


💥जिंतूर येथील सराफा व्यापारी रमेश शहाणेंच्या घरावर जिल्हा उपनिबंधकाच्या पथकाने धाड टाकुन दस्ताऐवज केले होते जप्त💥

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर

शहरातील एका सराफा व्यापाऱ्यावर अवैध सावकारी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद झाला होता. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे खरेदी खत करून अवैध सावकाराने जमीन बळकावली होती. पांढरगळा येथील शेतकऱ्याने याबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे तक्रार दिली. यामध्ये सुनावणी होऊन अवैध सावकारानेबळकावलेली जमीन शेतकऱ्याला परत देण्याचे आदेश ९ मे रोजी देण्यात आले आहे. 

या आदेशानंतर तालुक्यातील अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पांढरगळा येथील शेतकरी रामेश्वर ठोंबरे यांचे वडील आजारी असल्याने त्यांनी उपचारासाठी रमेश शहाणे यांच्याकडून ३ लाख रुपये व्याजाने घेतले. घेतलेली रक्कम व्याजासह परत करून जमीन वापस घेण्याचे ठरले. त्या प्रमाणे रमेश शहाणे यांनी त्यांची पत्नी अनुराधा शहाणे यांच्या नावे खरेदीखत करून घेतलेल्या शेतकऱ्याने ठरलेला

व्यवहार पूर्ण केला. मात्र अवैध सावकाराने बळकावलेली जमीन परत करण्यास नकार दिला. त्यानंतर रामेश्वर ठोंबरे यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. यामध्ये सुनावणी घेण्यात आली. अवैध सावकाराने जमीन बळकावली असल्याचे सिद्ध झाल्यावरून जिल्हा निबंधक मंगेश सुरवसे यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १८ (२ अंतर्गत ) सावकारी व्यवसाय करीत असल्याचे सिद्ध झाल्याने संबंधित शेतकऱ्याला त्याची जमीन परत नावावर करण्याचे आदेश दिले आहे.

जिंतूर शहरातील सराफा व्यापारी रमेश शहाणे यांच्या घरावर जिल्हा उपनिबंधकाच्या पथकाने धाड टाकुन दस्ताऐवज जप्त केले होते. यामध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे खरेदीखत, सोने, चांदी व नोंद वही, कोरे धनादेश अशा संशयास्पद वस्तू आढळून आल्या होत्या. या अवैध सावकाराविरुध्द आणखी तीन तक्रारीवर जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी सुरु आहे. पुंगळा येथील रामप्रसाद उपाध्य, जिंतूर शहरातील अविनाश घयाळ, कुन्हाडी येथील ऊषाबाई पवार यांच्या तक्रारीवर सुनावणी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सावकाराच्या पाशात जिंतूर तालुक्यातील इतर शेतकरी, गरजू व्यक्ती अडकले असल्याचे बोलल्या जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या