💥युवकांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी पुढाकार घ्यावा - सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत


💥सृजनशील कवीमनाची  समानतेसाठी साद : श्री शिवाजी महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा समारोप💥


परभणी : दि.०७ मे २०२२) :- स्त्री आणि पुरुष हे दोघेही श्रेष्ठ आहेत. स्त्री ही पुरुषापेक्षा एक इंच तरी श्रेष्ठ असली पाहिजे कारण ती सृजनशील असते. आजच्या सुधारणावादी काळामध्ये आपण जरी आभासी रूपाने विकसित झालो असलो तरीही जेवढ्या प्रमाणात स्त्री-पुरुष समानता रुजायला हवी होती तेवढी रुजली नाही त्यामुळे युवकांनी स्त्री-पुरुष समानतेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी केले.


      श्री शिवाजी  महाविद्यालयात आज शनिवार दि.०७ मे २०२२ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात  ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर उपस्थित होते. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशेट्टी, डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, समन्वयक प्रा.रविशंकर झिंगरे, समन्वयक तथा प्रसिद्धी प्रमुख डॉ.जयंत बोबडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अनंत राऊत म्हणाले, आत्मविश्वास यशाचे साधन असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतेही निर्णय घेताना प्रचंड आत्मविश्वास बाळगला पाहिजे. सर्वधर्मसमभावाची संस्कृती रुजवत महापुरुषांचे विचार अंगिकारून समाजहिताचे कार्य करावे. ज्यांना आईवडील कळाले त्यांना जग कळते. वर्तमानातील मोबाईल अतिरेकाने आपण आपली नाती, शिक्षण, आरोग्य, संस्कृती गमावत चाललो आहोत. अशावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःमधली क्षमतांना ओळखून त्या क्षमतेच्या जोरावर आपले करिअर निवडत समाजोपयोगी कार्य करावे असेही ते म्हणाले. राऊत यांनी माय-बाप, आयुष्याच्या संध्याकाळी नभासरखे व्हावे, कशाला वाचला चेहरा, लेकी बाईच जगणं, मित्र वनव्यामध्ये गरव्यासारखा आदी कविता सादर केल्या. त्यांच्या कवितांना प्रचंड प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी कवितांचा रसास्वाद घेतला. राऊत यांनी सलग दोन तास मार्गदर्शन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोरोनानंतर विद्यार्थ्यांमधली लेखन क्षमता कमी झाली असल्याचे दिसत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी लेखन वाचन कौशल्याचे दृढीकरण करून परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनच्या माध्यमातून आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे गुणात्मक दर्जा वाढीसह कलात्मक दर्जा ही वाढविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले. सदरील कार्यक्रमात विविध स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना तसेच क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि महाविद्यालय गीताने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रा.डॉ.जयंत बोबडे तर सुत्रसंचलन प्रा.रामप्रसाद देशमुख यांनी केले. 

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.संजय कुलकर्णी, डॉ.जे.एम.गायकवाड, डॉ.एस. एम.लोणकर, डॉ.एम.ए.भाटे, डॉ.परिमल सुतवणे, डॉ.आर.बी.टेकाळे, डॉ.संतोष कोकीळ, डॉ.प्रल्हाद भोपे, डॉ.राजू बडूरे, प्रा.सविता कोकाटे, विकास बाहेकर तसेच प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचार्यांच्या पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या