💥दिव्यांगाच्या ५ टक्के निधी वाटपा बाबत तामसी ग्रामपंचायतला निवेदन...!


💥जिल्हाध्यक्ष मोळकर यांच्या नेतृत्वात १६ मे रोजी तालुक्यातील तामसी ग्रामपंचायतला मागण्यांचे निवेदन देण्यात आले💥

फुलचंद भगत

वाशिम - दिव्यांगांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्नातुन दिव्यांगांना ५ टक्के निधी वाटप करण्याच्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर यांच्या नेतृत्वात १६ मे रोजी तालुक्यातील तामसी ग्रामपंचायतला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात नमूद आहे की, दिव्यांगांसाठी शासनाच्या वतीने विविध निर्णय निर्गमित करण्यात आले परंतु या निर्णयाची प्रशासकीय स्तरावर पुरेपुर अंमलबजावणी होतांना दिसत नाही. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींची समाज तसेच शासनाकडून प्रताडना होत असल्यामुळे त्यांच्या मनात निराशेची भावना निर्माण झाली आहे. तरी दिव्यांग व्यक्तींना समाजात ताठ मानेने व स्वाभिमानाने पोट भरण्यासाठी शासन निर्णयानुसार उपरोक्त बाबींची त्वरीत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दिव्यांगांच्या विविध मागण्यांची पुर्तता व्हावी यासाठी संघटनेच्या वतीने प्रशासकीय स्तरावर पाच वेळा निवेदन देण्यात आली आहेत. त्यामध्ये, शासन निर्णयानुसार दिव्यांगांचा ५ टक्के निधी खर्च करण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर तक्रार निवारण अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, नगर पालीका, नगर परिषद व ग्रामपंचायत स्तरावरील ५ टक्के निधी १५ दिवसाच्या आत खर्च करावा, आमचे गाव आमचा विकास या योजनेतील ५ टक्के निधी दिव्यांगांना वाटप करावा, दिव्यांगांसाठी नविन विभक्त शिधापत्रिका त्वरीत वाटप करावे, खासदार, आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून राखीव ५ टक्के निधी दिव्यांगांना वाटप करावा, दिव्यांगांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभासाठी प्राधान्य देवून जागा उपलब्ध करुन द्यावी आदी मागण्यांसाठी शासन तथा लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्यापही शासनाकडून या मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरी दिव्यांगांना समाजात मानाने जगण्यासाठी ग्रामपंचायतने आपल्या स्वउत्पन्नातुन गावातील नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात त्वरीत ५ टक्के निधी जमा करावा अशी मागणी मोळकर यांनी केली आहे. यावेळी निवेदन देतांना संघटनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख गंगुबाई पवार, यशोदा पवार, गोदावरी कुटे, गंगा पैठणकर, लक्ष्मी पैठणकर, गजानन वाघमारे, जया सरकटे, केशरबाई कव्हर, संतोष कव्हर, सुरेश डाेंंगरदिवे आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या