💥मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चौघांना गुजरातमध्ये अटक ; मागील 29 वर्षापासून होते फरार....!


💥अहमदाबाद मधील सरदारनगर भागातून 12 मे रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले💥

✍️ मोहन चौकेकर

अहमदाबाद - मुंबईमध्ये 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी “वॉन्टेड’ असलेल्या चार जणांना गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने आज अटक केली. गुजरात “एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अबू बकर, सय्यद कुरेशी, मोहम्मद शोएब कुरेशी उर्फ शोएब बावा आणि मोहम्मद युसूफ इस्माईल उर्फ युसूफ भटका अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मूळचे मुंबईचे रहिवासी असून गेल्या 29 वर्षांपासून ते फरार होते.त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यावर अहमदाबादमधील सरदारनगर भागातून 12 मे रोजी त्यांना ताब्यात घेण्यात आले, असे “एटीएस’चे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमित विश्‍वकर्मा यांनी सांगितले.

1993 नंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या पासपोर्टच्या आधारे देशातून पळून जाण्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवला गेला आहे. नंतर मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार आहे, असे एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले.ओळख लपवण्यासाठी या सर्वांनी खोट्या नावाचे पासपोर्ट मिळवले होते. सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावलेली होती.मात्र हे सर्वजण गुजरातला का आले होते, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही, असेही विश्‍वकर्मा म्हणाले.

* आयएसआयकडून घेतले प्रशिक्षण :-

हे चौघेही 1990 मध्ये दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद दोसा याच्यासाठी सोन्याची तस्करी करत असत, असे एटीएसचे पोलीस महानिरीक्षक दीपन भंडारी यांनी सांगितले. भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी दोसा याने या चौघांना 1993 च्या फेब्रुवारीमध्ये मध्यपूर्वेत दाऊदला भेटायला पाठवले होते. दाऊदच्या सूचनेनुसार ते शस्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानातही गेले होते. “आयइडी’ तयार करणे आणि वापरण्याचे प्रशिक्षण त्यांना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयनेही दिले होते,असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटात हे चौघेही सामील होते. बॉम्बस्फोटांनंतर बनावट पासपोर्टच्या आधारे ते मध्यपूर्वेतील वेगवेगळ्या देशांमध्ये पळून गेले. त्यांना फरार गुन्हेगार घोषित केले गेले होते, असेही भंडारी यांनी सांगितले..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या