💥वाढत्या विज मागणीच्या काळात महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राची अथक विक्रमी विज निर्मिती...!


💥सद्यःस्थितीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता २,९२० मेगावॅट इतकी आहे💥

नागपूर(दि.२६ एप्रिल) : राज्यात उन्हाळ्याची तीव्रता व त्या अनुषंगाने विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत असताना महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने अतिशय मोलाची कामगिरी बजावत गेल्या २३ दिवसांपासून सातही संचांमधून अखंड वीजनिर्मिती साध्य करीत आजवरची विक्रमी कामगिरी केली आहे.

सद्यःस्थितीत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची स्थापित क्षमता २,९२० मेगावॅट इतकी आहे.  चंद्रपूर येथे ५०० मेगावॅटचे एकूण ५ संच (संच क्र. ५ ते ९) व २१० मेगावॅटचे २ संच कार्यरत असून  ४ एप्रिलपासून आजतागायत या सातही संचांमधून गेले २३ दिवस सलग अहोरात्र वीजनिर्मिती सुरु आहे.  १ एप्रिल ते २५ एप्रिल २०२२ या काळात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राने एकूण १,३३४ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मिती केली असून अखंड वीजनिर्मितीतील चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्राची ही आजवरची विक्रमी कामगिरी आहे.   त्यापैकी संच क्र. ३ मधून १०५ द.ल.यु., संच क्र. ४ मधून ९५ द.ल.यु., संच क्र. ५ मधून २०५ द.ल.यु., संच क्र. ६ मधून १८९ द.ल.यु., संच क्र. ७ मधून २२४ द.ल.यु., संच क्र. ८ मधून २६२ द.ल.यु., व संच क्र. ९ मधून २५४ द.ल.यु. इतकी वीजनिर्मिती साध्य केलेली आहे.  या आधीच्या विक्रमानुसार डिसेंबर २०१८ मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक वीजकेंद्रातील सर्व संच सलग २१ दिवस कार्यरत होते.  

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र हे देशातीलच नव्हे तर आशियातील एक विख्यात महाऔष्णिक वीज केंद्र आहे.  या विद्युत निर्मिती केंद्राने आजवर वीजनिर्मितीचे अनेक विक्रम नोंदविले असून महानिर्मितीच्या एकूण औष्णिक वीजनिर्मितीत नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे.  ही विक्रमी कामगिरी साध्य करण्यासाठी मुख्यालय, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील सर्व संचांची देखभाल-दुरुस्तीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली.  तसेच उत्तमोत्तम कार्यसंस्कृती व उपलब्ध कोळसा साठ्याचा जबाबदारीने वापर यामुळेच ही कामगिरी शक्य झाली आहे.  विशेष म्हणजे महानिर्मितीच्या सातही वीजनिर्मिती केंद्रांमध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारा विजेचा दर हा सर्वांत स्वस्त असून तिथून जास्तीत जास्त वीजनिर्मिती साध्य झाल्याने राज्यातील वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.  चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील सर्व अभियंते व कर्मचारी वर्ग यांनी विपरीत परिस्थितीत सामुहिक प्रयत्नांद्वारे केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबाबत ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या