💥अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या....!


💥विविध मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वात जिल्हा कचेरीवर मोर्चा💥

फुलचंद भगत

वाशिम - मानधनवाढ, मासिक पेेन्शन, नविन मोबाईल, थकीत प्रवास भत्ता, शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा आदी विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी / बालवाडी कर्मचारी संघटना (आयटक) च्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत नेण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्षा सौ. सविता इंगळे, कार्याध्यक्ष कॉ. डिगांबर अंभोरे व सचिव मालती राठोड यांनी केले. जिल्हा कचेरीवर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा सविता इंगळे यांनी अंगणवाडी कर्मचार्‍यांना संबोधीत केले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


             या मागण्यांमध्ये, अंगणवाडी कर्मचार्‍यांना पुर्वप्राथमिक शिक्षीकेचा दर्जा देवून वेतनश्रेणी लागु करावी. तोपर्यत किमान वेतन रुपये १८ हजार व पेन्शन रुपये ९ हजार देण्यात यावे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना मासिक पेेंशन लागु करावी, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचार्‍यांना एकरकमी लाभ त्वरीत द्यावा. अंगणवाडी कर्मचार्‍यांना किरकोळ खर्चाची रक्कम ५ हजार करण्यात यावी. कोरोनाकाळात अंगणवाडी सेविकांकडून कोरोनाची कामे करवून घेतली परंतु शासन निर्णयानुसार घोषित १ हजार रुपये मानधन देण्यात आले नाही. शहरी व ग्रामीण भागात एकाच महिन्याचे १ हजार मिळावे परंतु काम दोन वर्षाचे करावे लागले. तरी त्यानुसार दोन वर्षाचे २४ हजार त्वरीत देण्यात यावे. वर्ष २०२१ ची उन्हाळी सुटी नष्ट न करता मार्च २०२२ मध्ये देण्यात यावी. अंगणवाडी सेविकामधून पर्यवेक्षिका पदाच्या जागा त्वरीत भराव्या. ऑनलाईन मासिक प्रगती अहवाल भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांवर सक्ती करु नये. मोबाईल रिचार्जचे दर वाढल्याने १ हजार रुपयाची तरतुद करावी. पोषण ट्रॅकर अ‍ॅप हा इंग्रजीऐवजी मराठी भाषेत देवून या अ‍ॅपला मानधन जोडू नये. मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रुपांतर करुन नियमित अंगणवाडी सेविकेप्रमाणे मानधन द्यावे. अंगणवाडी सेविकांना तात्काळ मासिक अहवाल व रजिस्ट्ररचा पुरवठा शासनामार्फत करावा. अंगणवाड्यामधील वजनकाटे नादुरुस्त असल्यामुळे त्वरीत नविन वजनकाटे उपलब्ध करावे. अंगणवाडी सेविकांच्या न्याय व कायदेशीर मागण्यांसाठी बजेटमध्ये आर्थिक तरतुद करावी. २०१८ ला दिलेला मोबाईल कालबाह्य झाल्यामुळे नविन व चांगल्या प्रतीचा मोबाईल द्यावा. अंगणवाडी सेविकांना पंतप्रधान जीवनज्योती विमा, सुरक्षा विमा, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना लागु कराव्या. यासह सेविकांना घरभाडे, इंधन, विम्यासह सर्व योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मोर्चात वंदना सुतार, संगीता खडसे, आत्माराम सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या