💥पत्रकारितेला तंत्रज्ञानाची जोड आवश्यक ; ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांचे प्रतिपादन....!


💥पत्रकारिता जीवन गौरव व उत्कृष्ठ सेवा गौरव सन्मान सोहळा ; अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून आयोजन💥

 ✍️मोहन चौकेकर

अमरावती : कोरोनासारख्या काळात अनेक माध्यमांची वाताहत झाली कित्येक जण बेरोजगार झाले आहेत. मात्र तरीही देखील केवळ तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळेच कठिण काळात देखील प्रसारमाध्यमे टिकून राहिली आहेत. आता तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय प्रसारमाध्यमांचा विकास अशक्य असून त्यासाठी आपल्याला पत्रकारितेसोबत कायम तंत्रज्ञानाची कास धरावी लागणार आहे असे प्रतिपादन देशोन्नतीचे प्रबंध संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी केले. 

           अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाद्वारा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व.सोमेश्वर पुसतकर सभागृहात पत्रकारिता जीवन गौरव तथा उत्कृष्ठ सेवा गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर, तर विशेष अतिथी म्हणून वसंतराव नाईक स्वावलंबी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, विभागीय उपायुक्त अजय लहाने, माहिती व जनसंपर्क विभागाचे विभागीय उपसंचालक हर्षवर्धन पवार, केंद्रीय जनसंपर्क विभागीय क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रभूवन झाला आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात दैनिक हिन्दुस्थानचे संपादक उल्हास मराठे यांचा पत्रकारिता क्षेत्रात ५५ वर्षे योगदान दिल्याबद्दल पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देऊन अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सोबतच पत्रकारिता क्षेत्रात २५ वर्षे सेवा दिल्याबद्दल दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी श्री मोहन अटाळकर, दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी श्री संजय पंड्या, दैनिक नवभारत-नवराष्ट्रचे ब्युरो चिफ त्रिदीप वानखडे, ग्रामीण गटातून लोकमतचे अनिल कडू यांचा उत्कृष्ठ सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल व पुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते. सोबतच पत्रकारिता क्षेत्रात विशेष योगदानाबद्दल डॉ.कुमार बोबडे, प्रा. अनिल जाधव, लोकमतचे श्री गणेश वासनिक, विदर्भ मतदारचे संजय बनारसे, डीडी सह्याद्रीचे यशपाल वरठे, विदर्भ मतदारचे नयन मोंढे, महाराष्ट्र टाईम्सचे जयंत सोनोने यांचा देखील सन्मानचिन्ह, शाल तसेच पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. 

                कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानाहून बोलताना अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, प्रकाश पोहरे यांच्या बोलण्यातून प्रेरणा घेत आपण जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार सुरू केला आहे. पत्रकारांच्या जरी विविध संघटना असल्या तरीही सर्वांना सामावून घेत कार्य करणारा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघ आहे. पत्रकारांनी अनेकांना घडविले असून तरीही देखील त्यांचेवर सतत आरोप होत असतात मात्र त्याचे निराकरण कधीही होऊ शकत नाही. पत्रकारांवर सतत आरोप करणाऱ्यांनी कधीही एखादी बातमी लिहून पहावी असे आवाहन देखील अग्रवाल यांनी केले. 

                कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजेंद्र बडनेरकर यांनी, प्रास्ताविक सरचिटणीस प्रफुल्ल घवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अरूण जोशी, उपाध्यक्ष चंदू सोजातिया, संजय शेंडे, सुनील धर्माळे, सुधीर भारती, पद्मेश जयस्वाल, नरेंद्र जावरे, प्रणय निर्बाण, अनुप गाडगे, विजय ओडे, मंगेश तायडे, सुरेंद्र आकोडे, संजय मापले, नितेश राऊत, विवेक दोडके, अनिल मुणोत, ऋषिकेश शर्मा, हुक्मीचंद खंडेलवाल, दयालनाथ मिश्रा, पवन शर्मा, बाबा राऊत, मनोज भेले, भारत थोरात, संतोष शेंडे, मनिष डोंगरे, लिना रंदळे, आदींनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे सर्व तालुकाध्यक्ष तथा सभासद आणि तसेच हव्याप्र मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, प्रशांत देशपांडे, नितीन मोहोड, माजी खासदार अनंत गुढे, संजय तिरथकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, श्रीकांत तराळ, डॉ.पद्माकर सोमवंशी, प्रा.अंबादास मोहिते, संजय मापले, हेमंत पाठक, रवी इंगळे, अश्विन गुर्जर, हुक्मीचंद खंडेलवाल, अमोल इंगोले, तसेच अमरावती जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पत्रकारांची जिद्द स्वीकारण्यासारखी ;-

           माझ्या सबंध आयुष्याच्या सामाजिक प्रवासात पत्रकारांचे मोठे योगदान राहिले आहे. शंकरबाबांना लोक ओळखायला लागले त्याचे कारण केवळ पत्रकारांनी माझ्यावर केलेले प्रेम आहे. पत्रकार मंडळी अतिशय जिद्दी असतात आणि ती जिद्द स्वीकारण्यासारखी असते असे सांगत शंकरबाबा पापळकर यांनी पत्रकारिता क्षेत्राचे कौतुक करत अंध-अपंग तसेच मानसिक विकलांग मुलांचे वयाच्या १८ व्या वर्षानंतर देखील पालन पोषण व्हावे यासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणी उपस्थितांसमोर केली. 

बाळासाहेबांच्या शिकवणूकीच्या बाहेर आम्ही जात नाही ;-

               जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे आभार व्यक्त करत श्री उल्हास मराठे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आपला पुरस्कार त्यांचे स्वर्गीय आई-वडिल, तसेच अरूण मराठे यांना समर्पित करत कुटूंबातील सर्वांचे सहकार्य आपल्याला लाभले असल्याचे सांगत त्यांचेही आभार मानले. स्व.बाळासाहेब मराठे यांनी आम्हाला जी शिकविण दिली त्याबाहेर जाऊन पत्रकारिता करण्याची आम्ही कधीही हिंमत करत नाही असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

सोशल मिडिया म्हणजे प्रसारमाध्यम नव्हे ;-

            सोशल मिडिया हा पूर्णपणे सामाजिक वापराचा मिडिया असून त्याची विश्वासार्हता मात्र अजिबात नाही. प्रगत देशांमध्ये सोशल मिडियावरून प्रसारमाध्यमे चालविली जात नाहीत. तसेच तिथे सोशल मिडियासाठी काही मर्यादा आखून देण्यात आल्या आहेत. भारतात मात्र असा कोणताही कायदा नसल्याने युट्युब चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रसारमाध्यमे सुसाट झाली असून त्यांची नोंदणी नाही किंवा त्यांना मर्यादा आणि विश्वासार्हता देखील नाही. त्यांना कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. सोशल मिडिया म्हणजे प्रसारामाध्यम नव्हे असे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी यावेळी बोलताना सांगतले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या