💥भारतात ही आर्थिक भेद आहेत पण त्याकडे आपले म्हणावे तसे लक्ष गेले नाही - डॉ. मोहनराव देशमुख


💥गोटे महाविद्यालयाच्या 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' सहावे पुष्प संपन्न💥

 वाशिम : मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे सहावे पुष्प न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, अहमदनगर येथील तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. मोहनराव देशमुख यांनी गुंफले. डॉ. देशमुख यांनी 1989 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. सुंदरराजन यांच्या मार्गदर्शनात संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 मार्च 2022 या दिवशी त्यांनी "महाराष्ट्रातील सामाजिक बदल आणि मार्क्सवाद" या विषयावर आपले व्याख्यान दिले.

डॉ. मोहनराव देशमुख यांनी आपल्या व्याख्यानातून, सामाजिक बदल म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती देली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक बदलांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि त्यानंतर उदयाला आलेले सहकार क्षेत्र, कामगार चळवळी इत्यादीचा आढावा घेतला. आज सहकार क्षेत्र आणि कामगार चळवळी संपुष्टात येत आहेत आणि त्यासाठी भांडवलदारी व्यवस्था कारणीभूत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मार्क्सवादी विचारधारा ही प्रामुख्याने आर्थिक भेद मिटविण्याचा उद्देशाने समोर आलेली विचारधारा आहे. मात्र आपल्या भारतामध्ये आर्थिक वर्गापेक्षा जातिवर्ग अधिक प्रभावी असल्यामुळे मार्क्सवादासाठी म्हणावे तसे अनुकूल वातावरण लाभले नाही. आपल्या भारतात ही आर्थिक भेद आहेत. मात्र आपल्याकडच्या लोकांनी धर्म, परंपरा, सणवार ईश्वर, मंत्रतंत्र यासारख्या बाबींना अधिक महत्व दिल्याने म्हणावा तसा आपला वैचारिक पाया मजबूत होऊ शकला नाही, किंबहुना यामुळेच आर्थिक भेदाकडे आपले म्हणावे तसे लक्ष गेले नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या