💥नेतनसा,कंकरवाडी व आगरवाडीच्या शेतकरी बचतगटांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट...!


💥शेतपिकांची पाहणी,शेतकरी बचतगटांशी साधला संवाद,अवजार बँक व जलसंधारण कामाची पाहणी💥 

फुलचंद भगत

वाशिम :- रिसोड तालुक्यातील नेतनसा,कंकरवाडी व आगरवाडी येथील शेतकरी बचतगटांना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी १८ फेब्रुवारी रोजी भेट दिली.यावेळी शेतातील पिकांची पाहणी करून बचतगटांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच अवजार बँक व जलसंधारण कामाची देखील पाहणी केली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.आकोसकर,तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप,तंत्र अधिकारी श्री कंकाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

           नेतनसा येथील शेतकरी दीपक बाजड व गजानन बाजड यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली.  महाज्योतीअंतर्गत लावलेल्या करडई पिकाची तसेच सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या गहू पिकाची पाहणी केली. संत्रा व नवीन पद्धतीने लावलेल्या मोसंबी पिकाची देखील पाहणी केली. मोसंबीत घेण्यात येत असलेल्या आंतरपिकाची पाहणी करून श्री. बाजड यांच्याकडून माहिती जाणून घेतली.यावेळी बाजड यांच्या दालमिलचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.श्री.गजानन बाजड यांच्या शेतात भाजी-भाकर व रोडग्याचा त्यांनी आस्वाद घेतला.

          कंकरवाडी येथे जय गजानन शेतकरी बचतगटाला भेट दिली.या गटाला पोकराअंतर्गत देण्यात आलेल्या अवजार बँकेची पाहणी केली.अवजार बँकेत मिळालेल्या कृषिविषयक यांत्रिक उपकरणांची माहिती त्यांनी संबंधित शेतकरी बचतगटातील शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.बचतगटातील शेतकऱ्यांना अवजार बँकेतील यांत्रिक उपकरणे कमी पैशाने भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येतात.त्यामुळे शेतकऱ्यांची कृषिविषयक नांगरणी, पेरणी,कोळपणी व अन्य कृषीविषयक कामे वेळेत होण्यास अवजार बँकेची मदत होत असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यांना यावेळी सांगितले. 

          आगरवाडी येथील जलसंधारण विभागाच्या सिमेंट नाला बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. या कामामुळे बंधाऱ्यात पाण्याची चांगल्या प्रकारे साठवणूक होत असल्याने आजूबाजूच्या शेतीत असलेल्या 4 ते 5 विहिरी व बोरवेलची भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने  सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्‍यांना यावेळी सांगितले. 

                नाविन्यपूर्ण योजनेतून आत्माअंतर्गत मधुमक्षिका पालन करीत असलेल्या आगरवाडी येथील  आदिवासी शेतकरी गटाला भेट देऊन मधूमक्षिका पालनाची तसेच अवजार बँकेची पाहणी केली.शेतकरी बचतगटाच्या शेतकऱ्यांशी  जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधून सेंद्रिय शेतीची,विविध पिकांची,सिमेंट नाला बंधाऱ्याची व अवजार बँकेची पाहणी करून माहिती जाणून घेतली.जिल्हाधिकारी यांच्या भेटीदरम्यान संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहायक व शेतकरी बचतगटातील शेतकरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या