🌟परभणीतील जिंतूर रस्त्यावरुन शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणार्‍या भयावह रस्त्याच्या निषेधार्थ बेशर्मीचे वृक्षारोपण....!


🌟शिवसेना महिला आघाडीने शासकीय स्त्री रुग्णालया समोर केली बेशरमाच्या झाडांची लागवड🌟

परभणी (दि.04 जुलै 2024) : परभणीतील जिंतूर रस्त्यावरुन शासकीय स्त्री रुग्णालयाकडे जाणार्‍या भयावह अवस्थेतील रस्त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला आघाडीच्या विधानसभा संघटक तथा माजी विरोधी पक्षनेत्या सौ.अंबीका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी आज गुरुवार दि.04 जुलै 2024 रोजी स्त्री रुग्णालयासमोरील खड्ड्यात एका गरोदर महिलेच्या हाताने बेशरमाची झाडे लावून रोष व्यक्त केला.

           सौ.डहाळे यांच्या नेतृत्वाखाली सौ. वंदना कदम, सौ. कविता नंदूरे, किर्ती चौधरी, शामा चांडक, संगीता टेहरे, वैशाली खांडे, मंदाकिनी वाघमारे, मीरा कर्‍हाळे, वैष्णवी सोनवणे, वैष्णवी भांडे, नेहा सोनवणे यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी स्त्री रुग्णालय गाठून जिंतूर रस्ता ते स्त्री रुग्णालयापर्यंतच्या भयावह अवस्थेतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयाकडे अनोख्या आंदोलनाद्वारे महापालिकेसह सर्वसामान्य नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. संपूर्ण शहरातील रस्ते भयावह अवस्थेत आहेत. रस्त्यात खड्डा की खडड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे. या स्थितीत सर्वसामान्य नागरिक दररोज आदळ आपट करीत या खडड्यांमधून ये-जा करत असून त्यामुळे पाठ आणि कंबरेचे दुखणे वाढले आहेत. अनेकांच्या मानेला पट्टाही लागला आहे. महिलांसह अबालवृध्दांना ये-जा करणे जिवघेणे ठरले असून या स्थितीत महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ. तृप्ती सांडभोर या खड्डे बुजविण्याचेसुध्दा तारतम्या दाखवित नाहीत, असे दुर्देवी चित्र आहे. त्या निषेधार्थच सौ. डहाळे यांनी स्त्री रुग्णालयासमोरील खडड्यांमध्ये एका गरोदर महिलेद्वारे बेशरमाची झाडे लावून महापालिके विरुध्दचा रोष व्यक्त केला.

         सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्‍न गंभीर बनले असून मनपा त्या बाबत ओळीनेसुध्दा बोलेनाशी झाली आहे. परंतु, दरवर्षी मालमत्ता करासह सेवाशुल्क, शिक्षण, पाणी लाभ व अनाधिकृत बांधकामाच्या माध्यमातून करोडो रुपये उकळत आहे. दरवर्षी कर-उपकर वाढत आहेत. असा खणखणीत आरोप सौ. डहाळे यांनी दिलासाशी बोलतांना व्यक्त केला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या