🌟परभणी जिल्ह्यात ‘अतिसार प्रतिबंध’ मोहिमेस सुरुवात.....!


🌟1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान राबविणार मोहिम : विजेंद्र मुंढे यांची माहिती🌟

परभणी (दि.03 जुलै 2024) :  ग्रामीण भागातील नागरिकांनी पावसाळ्यामध्ये पिण्याचे पाणी शुद्ध व निर्जंतुकीकरण करून प्यावे. तसेच त्यांना पावसाळ्यात उद्भवणारे अतिसार, कॉलरा यासारखे जीव घेणे आजार होऊ नयेत म्हणून 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिसार प्रतिबंध मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जल जीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक विजेंद्र मुंढे यांनी दिली.

            केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये जिल्ह्यात अतिसार प्रतिबंध मोहीम राबविण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर 1 जुलै रोजी या मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्रकल्प संचालक विजेंद्र मुंढे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पंचायत विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वरिष्ठ भू - वैज्ञानिक विभाग अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अभियान कालावधी हा आठ आठवड्यामध्ये राबविण्यात येणार असून या कालावधीत ग्रामस्थांमध्ये अतिसार प्रतिबंध मोहिमेसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. यात अंगणवाडी, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी एफ. टी.के किट द्वारे पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गाव बैठकीच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनेची गळती शोधून त्यांची देखभाल व दुरुस्ती करणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन तसेच डास उत्पत्ती ठिकाणाचे निर्मूलन करणे, गावात ठिकठिकाणी असणार्‍या कचर्‍याचे व्यवस्थापन करून त्याचे वर्गीकरण करणे वैयक्तिक तसेच संस्थात्मक स्तरावरील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

          दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावर योग्य पाणी पुरवठ्यासाठी योजनेची दुरुस्ती, स्त्रोत परिसर स्वच्छता, जलकुंभ स्वच्छता तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर स्वच्छता ठेवण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या