🌟परभणी महानगर पालिका प्रशासन नगरवासीयांना नागरीसुविधा पुरविण्यात असमर्थ तर मग ‘कर’ कसले भरायचे ?


🌟शिवसेना महिला आघाडीचा मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांना संतप्त सवाल🌟 

परभणी (दि.०२ जुलै २०२४) : परभणी शहरवासीयांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचे महानगरपालिका प्रशासनाने प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, महानगर पालिकाद्वारे शहरवासीयांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. परंतु, सर्वसामान्य नागरीकांवर या आर्थिक वर्षापासून मनपा प्रशासनाने मालमत्ता कर देयकात सेवा शुल्क,शिक्षण,पाणी लाभ कर व अनाधिकृत बांधकाम शास्ती असे उपकर लादून अन्यायाचा कळस केला आहे, अशी खरमरीत टिका शिवसेनेच्या नेत्या तथा महिला विधानसभा संघटक सौ.अंबीका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मनपा आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

                महानगरपालिका कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक सौ. तृप्ती सांडभोर यांची माजी नगरसेविका सौ. डहाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मंगळवारी भेट घेतली. या भेटीतून शहरवासीयांना मनपाद्वारे कोणत्या मुलभूत सोयी सुविधा पुरविल्या जातात, याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. प्राथमिक नागरी सेवा पुरविणे हे महापालिकेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, मनपाद्वारे औषधाला सुध्दा सोयी सुविधा पुरविल्या जात नाहीत, या उलट मात्र संयमी असणार्‍या सर्वसामान्य नागरीकांना या आर्थिक वर्षापासून सेवा शुल्क, शिक्षण कर, पाणी लाभ कर व अनाधिकृत बांधकाम शास्ती असे उपकर नव्याने लादून प्रशासनाने अक्षरशः जेरीस आणले आहे. नव्याने वाढविलेले उपकर म्हणजे महापालिकेच्या क्रुरपणाचा कळसच आहे. त्यामुळे महापालिकेने हे उपकर तात्काळ रद्द करावेत, नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे, नागरीकांना सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            महानगरपालिका हद्दीतील बहुतांशी भयावह अवस्थेतील रस्ते, तुंबलेल्या नाल्या, रस्त्या रस्त्यांवरील कचर्‍यांचे ढीग, वेळी-अवेळी आठ ते पंधरा दिवसास होणारा पाणी पुरवठा, बंद पथदिवे वगैरे प्राथमिक सोयी सुविधांवर सौ. डहाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने परखड शब्दात संताप व्यक्त केला. अनाधिकृत बांधकाम शास्ती लावून शहरातील सर्व बांधकामे अनाधिकृत आहेत, असे महापालिकेचे म्हणणे हे लज्जास्पद आहे, अशीही टिका केली. आधी नागरी सुविधा पुरवा मग कर आकारणी करा, तोपर्यंत आपणास वाढीव कर आकारणीचा अधिकार नाही, असेही म्हटले.

             यावेळी सौ. सुनिता कांबळे, सौ. उषा मुंडे, सौ. कविता नंदुरे, सौ. वंदना कदम, सौ. सुनिता शहाणे, सौ. शामा चांडक, सौ. संगीता टेहरे, सौ. संगीता चट्टे, सौ. मनिषा शिंदे, सौ. लता लांडे, उज्ज्वला शेंडे, अर्चना कदम आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या