🌟भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापना दिवस विशेष : अलौकिक,जवळपास दोनशे हस्तलिखिते सचित्र......!


🌟इतिहासाचार्य राजवाडे हे सन १८९० साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवीधर झाले🌟

इतिहास संशोधनाला चालना देण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली. या संस्थेचे संस्थापक इतिहासाचार्य वि.का.राजवाडे आणि सरदार खंडेराव मेहेंदळे होते. डेक्कन कॉलेजचे माजी विद्यार्थी इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि सरदार खंडेराव मेहेंदळे यांनी दि.७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. इतिहासाचार्य राजवाडे नावाने ओळखले जाणारे विश्वनाथ राजवाडे हे इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्तेही होते. ज्ञानवर्धक संकलित माहिती श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा यांनी येथे मांडली आहे... संपादक.

    इतिहासाचार्य राजवाडे हे सन १८९० साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवीधर झाले. पदवीचे शिक्षण चालू असताना त्यांचा महाविद्यालयातील प्राध्यापक रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्याशी परिचय झाला. राजवाडे यांच्यावर निबंधकार विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर, शब्दकोषकार परशुराम तात्या गोडबोले आणि काव्य इतिहास संग्रहकार साने यांच्या कार्यांचा प्रभाव होता. आजमितीला मंडळात ऐतिहासिक संशोधनासाठी उपलब्ध पाच प्रकारच्या संसाधनांचा संग्रह असा आहे- १. येथे अनेक प्रकारची कागदपत्रे उपलब्ध आहेत. बखरी, आदिलशाही, छ.शिवाजी महाराज, पेशवाई या काळातील पर्शियन व मोडी यांसारख्या लिपीतील पत्रव्यवहार व पत्रे इत्यादी. २. हस्तलिखिते- यामध्ये संस्कृत, कन्नड, मराठी, पर्शियन व अन्य भाषांतील हस्तलिखिते आहेत. यामध्ये धर्म, काव्य यांपासून ज्योतिष शास्त्रापर्यंतचे विषय आहेत. गीतापंचरत्नी, शकुनवंती यांसारखी जवळपास दोनशे हस्तलिखिते सचित्र आहेत. राष्ट्रीय हस्तलिखिते मिशनने मंडळाला जवळपास चाळीस हजार हस्तलिखितांचे डिजिटायजेशन करण्यास मदत केली आहे. येथे हाती घेण्यात आलेला आणखी एक प्रकल्प म्हणजे हस्तलिखितांचे वर्णनपर आकारविल्हे केलेले निर्देशन व सूची तयार आहे. ३. चित्रदालन- मंडळामध्ये विविध काळांतील आणि वेगवेगळ्या शैलीतील जवळपास बाराशे ते पंधराशे दुर्मिळ चित्रांचा साठा आहे. यांत अनेक राजे व राण्यांच्या प्रतिमाचित्रांचा समावेश आहे. ४. नाणी- मंडळामध्ये सोने, चांदी व तांबे यांच्या नाण्यांचा समृद्ध संग्रह आहे. ५. ताम्रपट- मंडळाकडे वेगवेगळ्या काळातील, राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव साम्राज्यांचे जवळपास तीस ताम्रपट आहेत. ही त्या संस्थापक मंडळींची अनमोल देणगी आहे.


मराठाकालीन इतिहासविषयक नोंदींच्या संग्रहाचे पुनरुज्जीवन आणि भारतीय इतिहासाचा शास्त्रीय अभ्यास या उद्देशांना चालना मिळावी, यासाठी ही संस्था उभारण्यात आली. त्याद्वारे दुर्मिळ हस्तलिखिते आणि प्रकाशित पुस्तकांचा संग्रह करण्याचा हेतू होता. राजवाडे यांच्या भाषणाने या मंडळाचे उद्घाटन झाले. मात्र, हे भाषण ऐकायला मेहेंदळे हे एकमेव श्रोते होते. संस्थेचे कार्यालय आधी मेहेंदळेंच्या अप्पा बळवंत चौकातील वाड्यात होते. नंतर ते शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सदाशिव पेठेतील आत्ताच्या जागेत स्थलांतरित झाले. ब्रिटीशकालीन स्थानिक पद्धतीने बांधलेली सद्याची इमारत सन १९१२ ते १९२० या दरम्यानच्या काळात बांधली आहे. सद्यपरिस्थितीत मंडळातील अन्य विभाग- १) प्रयोगशाळा- कागदपत्रांचे, हस्तलिखितांचे, तसेच इतर पुरातन वस्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयोगशाळा आहे. २) संशोधन आणि प्रकाशन विभाग- कागदपत्रे, ज्ञानपत्रिका, पुस्तके प्रकाशित करणे, उत्खनन उदा.कराड येथील सन १९४९ साली केलेले उत्खनन यासाठी एक स्वतंत्र विभाग आहे. ३) ग्रंथालय- यामध्ये दुर्मिळ, तसेच आता प्रकाशन थांबविलेल्या अशा अठरा हजारपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह आहे.

            प्रशासनाशी मतभेद झाल्याने सन १९२६ साली राजवाडे यांनी पुणे सोडले. त्यानंतर त्यांनी धुळ्याला जाऊन राजवाडे संशोधन मंदिर नावाची संस्था स्थापन केली. ते निघून गेल्यानंतरही मंडळाचे कार्य आपल्या ध्येयाबरहुकूम चालूच राहिले. मंडळाला अभ्यासकांनी दानादाखल पुस्तके, संशोधनपर निबंध देत खुप समर्थन दिले. राजवाडे यांचे शिष्य दत्तो वामन पोतदार, गणेश हरी खरे आणि वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी मंडळाच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मंडळाच्या मुख्य सभागृहाचे नंतर राजवाडे सभागृह असे नामकरण करण्यात आले. अनेक महत्त्वपूर्ण बैठकींचे साक्षीदार असलेल्या या सभागृहाचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या वारसा वास्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. या सभागृहाच्या पाठीमागे नव्याने बांधलेल्या सभागृहाला पोतदार सभागृह असे म्हणतात. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे नाव या सभागृहाला दिले आहे. पोतदार हे मंडळाचे पहिले सचिव होते. ते राजवाडे यांचे शिष्य आणि मंडळाचे विश्वस्तही होते. मंडळात चित्रशाळा नावाचा विभाग आहे. तेथे जुन्या चित्रांचा संग्रह आहे. त्यात बाराशे ते पंधराशेच्या आसपास जलरंगातील चित्रे आहेत. त्यामध्ये पुण्याचे जुने दुर्मिळ नकाशेही आहेत. काही सागरी नकाशांचादेखील त्यात समावेश आहे. खरे संग्रहालय हे मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. डॉ.ग.ह.खरे यांचे नाव या संग्रहाला दिले आहे. ते नामवंत अभ्यासक होते, तसेच ते जवळपास पन्नास वर्षे मंडळाशी संबंधित होते.

            भारत इतिहास संशोधक मंडळ न्यासातर्फे मंडळाचे कामकाज पाहिले जाते. हा न्यास ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संघटना आहे. याचे कामकाज खासगी आणि सार्वजनिक देणग्या, सरकारी आणि खासगी अनुदाने तसेच सभासदत्व शुल्क यांवर चालते. डॉक्टर जस्टीन ऍबॉट यांनी सन १९२९ साली तीस हजार डॉलर, आर.व्ही.ओतूरकर यांनी वाचनालय व त्रैमासिक यांच्यासाठी वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ पंचवीस हजार रुपये तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांनी मूळ इमारतीमागे नव्या इमारती बांधण्यासाठी दिलेले तीन लाख रुपये अशा काही महत्वपूर्ण देणग्या या मंडळाला मिळाल्या. मंडळाने सन १९३५ साली रौप्यमहोत्सवावेळी अखिल भारतीय महासभेचे आयोजन केले होते. त्यावेळी पन्नास प्रतिनिधींना घेऊन इंडियन हिस्ट्री काँग्रेसची स्थापना करण्यात आली. मंडळातर्फे त्रैमासिक नावाचे नियतकालिक प्रकाशित केले जाते. या नियतकालिकात निबंध, लेख आणि नव्याने सापडलेल्या पुरातन वस्तू अथवा ऐतिहासिक संशोधन या गोष्टींविषयी माहिती प्रकाशित केली जाते. मंडळातर्फे नियमितपणे भाषणे, कार्यशाळा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. तसेच भारतातील आणि भारताबाहेरील युवा संशोधकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

           सन २०१२ साली मंडळाच्या संग्रहातील जवळपास चाळीस हजार हस्तलिखिते तसेच रामायण, महाभारत, पुराणे आणि वेदविषयक संस्कृत पोथ्या डिजिटाइज्ड करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय हस्तलिखित मिशनअंतर्गत दिलेल्या निधीतून हे शक्य झाले. भारतातील तसेच अमेरिका, रशिया आणि बेल्जियम या देशांतील अभ्यासक आपल्या संशोधनासाठी येथे भेट देतात. दुर्मिळ व प्राचीन कागदपत्रे तेथे उपलब्ध असल्याने ही मंडळी भेट देत असल्याचे मंडळाचे संचालक श्रीकृष्ण भावे हे सांगतात. मंडळाच्या संग्रहात चौदाव्या शतकातील पर्शियन भाषेतील गुलिस्तान नावाचे काव्य तसेच आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, कृषीशास्त्र, विज्ञान या विषयांवरचे प्रबंध आणि भाष्यग्रंथ आहेत. आज मंडळात ऐतिहासिक कागदपत्रे, पोथ्या, नकाशे, चित्रे, नाणी, शिल्प, ताम्रपट, शस्त्रे, ऐतिहासिक पुस्तके सुरुवातीच्या काळातील मराठी वृत्तपत्रे आणि अन्य अनेक गोष्टींचा खजिना आहे. मंडळातील व्यवहारांसाठी प्राथमिक भाषा म्हणून मराठीचा वापर केला जातो, हे येथे अभिमानाने उल्लेखनीयच!  

!! इतिहास मंडळ स्थापना दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

                    - संकलन व सुलेखन -

                      श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा

                        द्वारा- श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ,

                        मु. रामनगर, गडचिरोली.

                         मधुभाष- ७७७५०४१०८६.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या