🌟परभणीत ‘गरजवंत मराठ्यांची संवाद रॅलीसाठी’ आलेल्या मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत...!


🌟शहरात ‘गरजवंत मराठ्यांची संवाद’ रॅलीत उपस्थित राहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय दाखल : वाहतूकीच्या मार्गात बदल🌟


परभणी (दि.07 जुलै 2024) :- परभणी शहरात ‘गरजवंत मराठ्यांची संवाद रॅली’ या उपक्रमांतर्गत आलेल्या मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे आज रविवार दि.07 जुलै रोजी दूपारी 02.00 वाजता मोठ्या जल्लोषात अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले जरांगे पाटील यांचे दुपारी एकच्या सुमारास परभणी जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजे  झिरो फाट्यावर आगमन झाले; तेव्हा सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे सीमेवर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतिषबाजीसह प्रचंड घोषणांनी झिरोफाटा अक्षरशः दणाणला.

तिथून शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह रॅली ने परभणी कडे कुच केली. परभणी ते वसमत या मार्गावर ठिकठिकाणी या रॅलीचे खेड्यापाड्यातील ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.वसमत रस्त्याने दोनच्या सुमारास रॅली परभणीत दाखल झाली, कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पाठोपाठ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जरांगे पाटील यांनी  अभिवादन केले, तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करीत व त्या ठिकाणी उपस्थित हजारोच्या जनसमुदायास अभिवादन करीत जरांगे पाटील यांनी नूतन विद्यालयाच्या मैदानाकडे प्रस्थान केले आहे.

* दरम्यान त्या ठिकाणाहून मोठी रॅली निघणार आहे :-

संवाद रॅली निमित्य शहरासह परिसरातील खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येने  लाखो समाज बांधव परभणीत दाखल झाले आहेत, त्यामुळे या रॅली मार्गावरील सर्व रस्ते या गर्दीने अक्षरशः फुलले आहेत.सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रविवारी  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ‘संवाद रॅली’स जिंतूर रस्त्यावरील विसावा चौक येथून रॅलीस प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली जेल कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, पोलिस पेट्रोल पंप, नानलपेठ कॉर्नर,  छत्रपती शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात येणार आहे.

            दरम्यान, जिल्ह्याभरातून जरांगे पाटील यांच्या रॅली व संवाद यात्रेकरीता मोठ्या संख्येने नागरीक वाहनांद्वारे परभणी शहरात दाखल झाले आहेत. त्याकरीता विविध ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून नागरीकांनी या ठिकाणीच आपली वाहने उभी करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

* जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल :-

              रॅली दरम्यान वाहतूकीचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून प्रशासनाने सकाळी 11.00 ते सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत वसमत,गंगाखेड, जिंतूर व पाथरी रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या कालावधीत ही वाहने इतर मार्गाने वळविण्यात आली. हिंगोली वसमत मार्गे येणारी जड वाहने झिरोफाटा, पूर्णा, ताडकळस, सिंगणापूर फाटा, उमरी फाटा, पाथरी मार्गे संभाजीनगरकडे जातील. वसमत व हिंगोलीकडून गंगाखेडकडे जाणारी वाहने याच मार्गे सिंगणापूर, पोखर्णी, दैठणा, गंगाखेड मार्गे परळीकडे . तसेच गंगाखेडकडून जिंतूरकडे जाणारी वाहने पोखर्णी मार्गे पाथरी, सेलू, देवगाव फाट्याकडून जिंतूरकडे. तर पाथरी, माजलगाव मार्गे नांदेडला जाणारी वाहने पोखर्णी, सिंगणापूर फाटा, ताडकळस, पूर्णा, चुडावा मार्गे नांदेडकडे . जिंतूरकडून गंगाखेडकडे जाणारी वाहने देवगाव फाटा, सेलू, पाथरी, पोखर्णी, दैठणा मार्गे गंगाखेड कडे वळवण्यात आली. या कालावधीत जड वाहनांनी पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या पर्यायी मार्गाद्वारेच पुढे प्रस्थान करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या