🌟परभणीत मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उद्या ‘संवाद’ रॅली.....!


🌟शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल : विविध ठिकाणी पार्कींगची व्यवस्था🌟

परभणी (दि.०६ जुलै २०२४) :- परभणीत उद्या रविवार दि.०७ जुलै २०२४ रोजी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात संवाद रॅली काढण्यात येणार असून त्यानिमित्त शहरातील वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत तसेच रॅलीस येणार्‍या नागरीकांची गर्दी लक्षात घेता विविध ठिकाणी पार्कींगची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

             सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रविवारी सकाळी ११.०० वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ‘गरजवंत मराठ्यांची संवाद रॅली’ आयोजित करण्यात आली असून जिंतूर रस्त्यावरील विसावा चौक येथून रॅलीस प्रारंभ होणार आहे. तेथून ही रॅली जेल कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, पोलिस पेट्रोल पंप, नानलपेठ कॉर्नर,  छत्रपती शिवाजी रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात येणार आहे.

            दरम्यान, जिल्ह्याभरातून जरांगे पाटील यांच्या रॅली व संवाद यात्रेकरीता मोठ्या संख्येने नागरीक वाहनांद्वारे परभणी शहरात दाखल होणार आहेत. त्याकरीता विविध ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात आली असून नागरीकांनी या ठिकाणीच आपली वाहने उभी करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.....

* जड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल :-

              रॅली दरम्यान वाहतूकीचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून प्रशासनाने सकाळी ११.०० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत वसमत, गंगाखेड, जिंतूर व पाथरी रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत ही वाहने इतर मार्गाने वळविण्यात आली आहेत. हिंगोली वसमत मार्गे येणारी जड वाहने झिरोफाटा, पूर्णा, ताडकळस, सिंगणापूर फाटा, उमरी फाटा, पाथरी मार्गे संभाजीनगरकडे जातील. वसमत व हिंगोलीकडून गंगाखेडकडे जाणारी वाहने याच मार्गे सिंगणापूर, पोखर्णी, दैठणा, गंगाखेड मार्गे परळीकडे जातील. तसेच गंगाखेडकडून जिंतूरकडे जाणारी वाहने पोखर्णी मार्गे पाथरी, सेलू, देवगाव फाट्याकडून जिंतूरकडे जातील. तर पाथरी, माजलगाव मार्गे नांदेडला जाणारी वाहने पोखर्णी, सिंगणापूर फाटा, ताडकळस, पूर्णा, चुडावा मार्गे नांदेडकडे जातील. जिंतूरकडून गंगाखेडकडे जाणारी वाहने देवगाव फाटा, सेलू, पाथरी, पोखर्णी, दैठणा मार्गे गंगाखेड कडे जातील. या कालावधीत जड वाहनांनी पोलिस प्रशासनाने ठरवून दिलेल्या पर्यायी मार्गाद्वारेच पुढे प्रस्थान करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या