🌟‘संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळा’च्या योजनांसाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन...!


🌟आवाहन जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे🌟

परभणी (दि.11 जुलै 2024):  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासाठी  सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत 50 व बिजभांडवल योजने अंतर्गत 56  तसेच विविध योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींकडून कर्जाचे प्रस्ताव 31 जुलैपर्यंत पाठविण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अरुण राऊत यांनी केले आहे.  

 एन.एस.एफ.डी.सी. यांच्या योजनांचे भौतिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. मुदती कर्ज योजना ५०, महिला समृद्धी योजना ५८, लघुऋण वित्त ३७, शैक्षणिक कर्ज २०, नवीन मुदती कर्ज २, महिला अधिकारीता  २, नवीन लघुऋण वित्त ११, नवीन महिला सम्रध्दी ११, असे उष्टि प्राप्त झाले आहे. वरील दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात व इतर सर्व योजना या एन.एस.एफ.डी.सी.नवी दिल्ली मार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणा-या चांभार, डोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायांसाठी कर्जप्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणा-या अर्जदारांनी या पूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत खालील ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे. त्रयस्थ अथवा मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत.

* अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-

            जातीचा दाखला (सक्षम अधिका-याकडुन घेतलेला असावा.), उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचा सिबील स्कोअर ५०० च्या वर असणारा रिपोर्ट किंवा नो-स्कोअर,  तीन छायाचित्रे, शैक्षणिक दाखला, राशन कार्ड, आधार /मतदान  अथवा पॅन कार्डची छायांकित प्रत, व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन) जी.एस.टी.सह,  जागेची भाडेपावती/करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं.८), वीजबील, टॅक्स पावती, बिजभांडवल व इतर योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहन परवाने, व्यवसायाचे ग्रा.पं./न.प. म.न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट लायसन्स. तसेच उद्यमी आधार, तांत्रिक प्रमाणपत्र तसेच व्यवसायानुसार अनुभवाचा दाखला. पूर्वी अनुदान न घेतल्याबाबत 100 रुपयांच्या बॉडवर प्रतिज्ञापत्र आदि विविध योजनांच्या अनुषंगाने लागणारी सर्व कागदपत्रे (जामीनदार, बाँड, वारसाचा पुरावा) आवश्यक राहतील. वरील सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार 18 ते 50 वयोगटातील असावा.  

  योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत, शासकीय सुट्ट्या वगळता जिल्हा कार्यालय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. मुंबई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, परभणी या ठिकाणी स्विकारले जातील. जिल्ह्यातील चांभार, ढोर, मोची आणि लोहार समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु अर्जदारांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यां नी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या