🌟परभणी महानगर पालिका प्रशासनाकडून शहरात 29 ठिकाणी सहाय्यता केंद्र स्थापन....!


🌟मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महानगर पालिकेने कर्मचार्‍यांची केली नियुक्ती🌟

परभणी (दि.11 जुलै 2024) :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेकरिता महानगरपालिकेने शहरात 29 ठिकाणी सहाय्यता केंद्राची स्थापना करुन त्या ठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.


          मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या अंमलबजावणीकरिता महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करुन त्यांच्याद्वारे प्राप्त अर्जाची छाननी करणे, तात्पुरती यादी प्रसिध्द करणे, त्यावर प्राप्त झालेल्या हरकती, आक्षेप यांचे निराकरण करणे तसेच तात्पुरती सुधारित पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी अंतीम मान्यतेसाठी सादर करावयाची आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेने शहरी भागात या योजनेच्या अंमलबजावणीकरीता 29 सहाय्यता केंद्र स्थापन केले असून त्यावर कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

              या कर्मचार्‍यांना आज गुरुवारी दि.11 जुलै रोजी येथील बी.रघुनाथ सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त मिनिनाथ दंडवते, बालविकास प्रकल्प अधिकारी मिलींद वाघमारे, मुख्य सेविका विद्या दानेकर, शहर अभियान व्यवस्थापक यखत्यार पठाण यांनी मार्गदर्शन केले. या योजनेच्या अ‍ॅप्लिकेशनच्या वापरासह अर्ज स्विकृतीबाबत कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले.

              या योजनेकरिता लाभधारकांनी दि.12 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत महानगरपालिकेने निश्‍चित केलेल्या जवळच्या मदत केंद्रावर जावून निशुल्क अर्ज दाखल करावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या