🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजन संदर्भात बैठक संपन्न....!


🌟जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व तयारीची बैठक संपन्न🌟


परभणी (दि. 14 जुन 2024) : सर्वत्र 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचे आयुष्य निरोगी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि सहज साध्य होतील, अशा योगासनांची माहिती शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना देण्याच्या उद्देशाने परभणी जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षेत जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन पूर्व तयारीची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, तहसीलदार संदीप राजापुरे, समाजकल्याण सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांच्यासह जागतिक योग समिती, परभणीचे सर्व सदस्य यांची उपस्थित होती.जिल्हा प्रशासन आणि जागतिक योग समिती, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून रोजी येथील राजगोपालाचारी उद्यान येथे सकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. जर पाऊस आला तर जिल्हा क्रिडा संकुलातील बॅडमिंटन हॉल मध्ये योग दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील शाळा-महाविद्यालय, शासकीय कार्यालय, संस्था यांना योग प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास जागतिक योग समिती, परभणी यांच्या वतीने योग शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी किमान एक हजार नागरिक व विद्यार्थी योगा करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून दर्शनी भागात योग दिनाचे बॅनर लावण्यात यावे, नागरिक व शालेय विद्यार्थ्यांसाठी पाण्याची सुविधा करावी, ध्वनिक्षेपक लावावे, मॅटची व्यवस्था करावी अशाही सूचना संबंधितांना यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या