🌟परभणी लोकसभा मतदारसंघाची उद्या मतमोजणी : मतमोजणी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न....!


🌟जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीकरीता योग्य नियोजन केले आहे🌟


परभणी (दि.3 मे 2024) : 17-परभणी लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी 4 जून रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे होणार आहे. आज  यासाठी परभणी जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असुन, 95-जिंतूर, 96- परभणी आणि 97 गंगाखेड मतदार संघासाठी कृष्णकुमार निराला तर 98-पाथरी, 99-परतूर आणि 100-घनसावंगी मतदारसंघासाठी एन.मोईनोद्दीन हे निवडणूक निरिक्षक म्हणुन काम पाहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.


17-परभणी लोकसभा मतदारसंघाचे दि.26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असुन, मतदार संघात एकूण 62.26 टक्के मतदान झाले आहे. परभणी लोकसभा निवडणूकीची वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार, दि. 4 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीकरीता योग्य नियोजन  केले आहे. 


परभणी लोकसभा मतदार संघाच्या आज होणाऱ्या मतमोजणी मध्ये 95-जिंतूर मतदारसंघात 31 फेऱ्या तर 96- परभणी मध्ये 24 फेऱ्या, 97 - गंगाखेड मध्ये 31 फेऱ्या, 98- पाथरी मतदारसंघात 29 फेऱ्या, 99-परतूर मतदार संघात 25 फेऱ्या आणि 100-घनसावंगी मतदार संघात 26 फेऱ्या होणार आहेत. या सर्व सहा विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. तसेच पोस्टल मतमोजणीकरीता 14 टेबल तर ईटीपीबीएस मतमोजणीकरीता 6 टेबल असणार आहेत. मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी 14 टेबलांकरीता प्रत्येकी 3 असे एकुण 42 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर पोस्टल मतमोजणीकरीता टेबलनिहाय 4 आणि ईटीपीबीएस मतमोजणीकरीता प्रत्येकी 3 असे अधिकारी-कर्मचारी यांची नियूक्ती करण्यात आली आहे. 

सरमिसळ प्रक्रियेद्वारे मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व सुक्ष्म निरीक्षक यांना आज निवडणूक निरिक्षक कृष्णकुमार निराला आणि एन. मोईनोद्दीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे  आणि अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी मतमोजणी प्रकिये संदर्भात सविस्तर प्रशिक्षण दिले.

परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सुरुवात ही प्रथम टपाली मतपत्रिका (पोस्टल) मोजणीद्वारे होणार असून, यामध्ये मतदान कर्मचारी व सर्व्हिस व्होटर्सच्या मतदानाचा समावेश आहे.तसेच एकूण ईव्हीएमप्रमाणे मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ड्रॉ पध्दतीने निवडलेल्या पाच मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅटची निवड करून त्यामधील मतदान चिठ्ठयांची मोजणी करण्यात येणार आहे. तसेच ईव्हीएमच्या मतांशी त्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरु होणार असून, निवडणूकीचा निकाल संध्याकाळी सुमारे 5 वाजेपर्यंत हाती येण्याची शक्यता असल्याचे सांगत ज्याप्रमाणे मतदान प्रक्रिया कोणत्याही अनुचित घटनेशिवाय शांततेत पार पाडली. त्याचप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया देखील शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

* मतमोजणी केंद्राच्या परिसरात मनाई आदेश लागू :-

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुक विषयक कामासाठी नियुक्त अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात असणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने दिनांक 4 जून, 2024 रोजी सकाळी 6:00 ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत सदर आदेश अंमलात राहणार आहेत. मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडप, सर्व दूकाने मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त खाजगी वाहन व निवडणूक कामा व्यतिरीक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध असणार आहे. 

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मतमोजणीचे वृत्त संकलन करण्यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मिडिया सेंटर तयार करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकरपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाच याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मिडीया सेंटर येथे ठेवावा लागणार आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या