🌟निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित योगा महत्त्वाचा - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यान येथे जागतिक योग दिन साजरा🌟


परभणी (दि.२१ जुन २०२४) : आपल्याला दैनंदिन धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनशांती हवी असते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात योगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून, निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित योगा करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. जागतिक योग दिनानिमित्त आयोजित आज राजगोपालचारी उद्यान येथे सकाळी योग दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.  


कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्री. पोलस, तहसीलदार डॉ. संदिप राजापुरे जागतिक योग उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे व्यासपीठावर उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित योगसाधकांचे स्वागत करून श्री.गावडे म्हणाले, योग दिनाची परंपरा ही हजारो वर्षापासून आपल्या भारतात सुरु आहे. भारतीय जीवनशैलीत योग ही एक महत्त्वाची साधना असून, योग साधनेला अध्यात्मिकतेची जोड असून, त्यामुळे आत्मा, शरीराला शांती मिळते. नियमित योग साधना केल्यास आपल्या जिवनात ५० ते ६० टक्के व्याधी दूर होतात. जिवनात दररोज किमान अर्धातास नियमित योगा करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 

यावेळी डॉ. दिपक महिंद्रकर (योग साधना केंद्र), डॉ. चारुशिला जवादे (मुक्ताई योग केंद्र), डॉ. अशोकराव शेलगावकर (क्रीडा भारती), कृष्णा कवडी (सचिव, जिल्हा योग संघटना), डॉ. ए.एन. शेळके (सत्य साई सेवा केंद्र), प्रा. अनिल वडगुजर (पंतजली योगपीठ), मोहन गंधर्व (निरामय योग केंद्र), संजय मुंढे (राज्य क्रिडा मार्गदर्शक), श्री. चव्हाणी (निरंकारी सेवा मंडळ) यांच्यासह शहरातील सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कुल, मराठवाडा हायस्कुल, बालविद्या मंदिर, गांधी विद्यालय या शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी, मुख्याध्यापक, नागरिक, अधिकारी/कर्मचारी, योग शिक्षक आणि योगसाधक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी मुक्ताई योग केंद्र आणि निरामय योग प्रसार केंद्र यांनी योगावर आधारित योगनृत्य व नाटीका सादर करण्यात आली. योगशिक्षक श्रीमती डॉ. चारुशिला जवादे यांनी प्रात्यक्षिक केले. तसेच चि. पवन पागोटे यांनी योगावर आधारित माहिती व कविता सादर केल्यामुळे याचा जिल्हाधिकारी रधुनाथ गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सुभाष जावळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सुत्रसंचलन प्रशांत जोशी यांनी केले. सुरवातीला जिल्हाधिकारी श्री.गावडे  यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली...... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या