🌟शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.28 जुन 2024) : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व क्रीडानिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी चाचणीसाठी आपले अर्ज 5 जुलैपर्यंत राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे (9422178009) यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले आहे. 

क्रीडा प्रबोधिनीमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, नेमबाजी, फुटबॉल, जलतरण, अँथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, धनुर्विद्या, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, ट्रायथ्लॉन, सायकलिंग, मुष्ठियुद्ध अशा 17 क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. खेळनिहाय प्रवेश मर्यादा विचारात घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया या खेळनिहाय कौशल्य चाचणीबाबत अर्हता खालीलप्रमाणे आहे. 

सरळ प्रवेश प्रक्रियेसाठी क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या सबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षेआतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.खेळनिहाय कौशल्य चाचणी अंतर्गत क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे, अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो. या चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते. 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये सन 2024-25 साठी सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रवेश प्रक्रीया व खेळ निहाय कौशल्य चाचणी कार्यक्रमाअंतर्गत जिल्हास्तर नावनोंदणी अंतिम दिनांक 5 जुलै पर्यंत आहे. (जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड, खेळाडूचे प्रमाणपत्र छायांकीत प्रत सोबत आणावे), विभागस्तर चाचण्यांचे आयोजन सरळ प्रवेश दि. 8 जुलै व कौशल्य चाचणी 9 जुलै (स्थळ कळविण्यात येईल.), राज्यस्तरीय चाचण्याचे आयोजन सरळ प्रवेश 15 जुलै, 2024 व कौशल्य चाचणी 16 जुलै, 2024 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नावंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या