🌟परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी ई-केवायसी करून घ्यावी - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ई-केवायसी करून घ्यावी🌟

परभणी (दि.25 जुन 2024) : परभणी जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

 माहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 च्या सततच्या पावसाचे, मार्च 2023 मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या फळपिकांचे, व माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. जिल्ह्यातील शेतक-यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. 

त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन, मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून VK (विशिष्ट क्रमांक) घेऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.त्याबाबत तहसील कार्यालयाकडून तलाठ्यामार्फत जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. अशा शेतक-यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून ती  करून घ्यावी अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या