🌟भारतीय जनता पार्टीने आत्मपरीक्षण करावे : खासदार संजय जाधव


🌟प्रचंड मताधिक्याने विजय मिळविल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलतांना खा.जाधव म्हणाले🌟 

परभणी (दि.०४ मे २०२४) :  परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या दणदणीत पराभवाबद्दल भारतीय जनता पार्टीने आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिला.

              लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजय मिळविल्याच्या पार्श्‍वभूमीवर जाधव यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना सत्तारुढ महायुतीच्या व्यूहरचनेवर कडाडून टिका केली. भारतीय जनता पार्टीने सातत्याने कटकारस्थाने आखली. विरोधी पक्षास सळो की पळो करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत द्वेषपूर्ण भावनेतूनच वेगवेगळ्या प्रकारे कारवाया करण्यात आल्या. त्या गोष्टीच सर्वसामान्य व्यक्तींनासुध्दा आवडल्या नाहीत. तसेच निवडणूकीतसुध्दा जानकर यांना या मतदारसंघात हेतुतः लादून जाती-पातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाचा हा संधीसाधूपणा या जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांनी हेरला अन् निवडणूकीत महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव करीत जागा दाखवून दिली, असे जाधव म्हणाले.

या निवडणूकीत विकासावर चर्चा होईल, असे अपेक्षित होते. दुर्देवाने महायुतीने केवळ जातीवादी वळण द्यावयाचाच प्रयत्न केला. ओबीसी मतांवर लक्ष केंद्रीत करीत ठराविक जाती पातीच्या आधारावरच आपण यशस्वी होवू असे डाव आखले. परंतु, त्या विरोधात या जिल्ह्यातील कार्यकर्ता काय सर्वसामान्य माणूससुध्दा उभा राहिला. निवडणूक स्वतःच्या हातात घेवून सर्वसामान्य नागरीकांनी महायुतीचा विशेषतः भारतीय जनता पार्टीचे षडयंत्र हाणून पाडले, असे ते म्हणाले.

            आपल्या विजयाबद्दल सर्वसामान्य मतदारांचे, आघाडीचे आभार व्यक्त करीत जाधव यांनी आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहोत, अशी ग्वाही दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या